लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता मिळणार नाही? मंत्री आदिती तटकरेंच्या वक्तव्यानं खळबळ
लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता मिळणार नाही? मंत्री आदिती तटकरेंच्या वक्तव्यानं खळबळ
img
Dipali Ghadwaje
लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेत आहे. लाडक्या बहिणींना जानेवारीचा 1500 रुपयांचा हप्ता 26 जानेवारीनंतर दिला जाणार असला तरी 2100 रुपयांचा हप्ता मिळण्याची शक्यता कमी असल्याची चर्चा आहे.  आता याबात एक महत्वाची अपडेट समोर आली आहे . 

लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याचे आश्वासन महायुतीने विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात दिले होते. पण यंदाच्या अर्थसंकल्पात ते आश्वासन पूर्ण होण्याची शक्यता दिसत नाही. यासाठीची कोणतीही पूर्वतयारी विभागाने केलेली नाही, तसा प्रस्ताव तयार करून अर्थ विभागाकडे पाठवलेलाही नाही.

महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनीही यास दुजोरा दिलेला आहे. "आर्थिक भार किती आहे, याबाबतचा अभ्यास करून २१०० रुपयांचा निर्णय घेतला जाणार आहे. महायुतीच्या घोषणापत्रात २१०० रुपयाचे आश्वासन असल्याने कालांतराने ती लागू केली जाईल.

मात्र यंदाच्या अर्थसंकल्पात ही वाढ लागू करण्याबाबत विभागाने अद्याप तयारी केलेली नाही. तशा सूचनाही मुख्यमंत्री आणि दोन्ही उप मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या नाहीत' असे मंत्री आदिती तटकरे यांनी एका वृत्त संस्थेशी  बोलताना स्पष्ट केले.

गेल्या अर्थसंकल्पी अधिवेशनात लाडकी बहीण योजनेची घोषणा उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली होती. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीने ही योजना राज्यात राबवून सव्वा दोन कोटींपेक्षा अधिक महिलांना पंधराशे रुपये दिले जात आहेत. त्यासाठी ४६ हजार कोटींची तरतूद करण्यात आली होती.

नव्या अर्थसंकल्पात महायुती त्यांच्या जाहीरनाम्यातील आश्वासनाप्रमाणे दोन हजार १०० रुपये देणार, असे अपेक्षित होते, मात्र या अर्थसंकल्पात 'लाडक्या बहिणीं'चा आर्थिक भार अजून वाढू नये याची काळजी महायुती सरकारने घेतली आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group