‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’बाबत एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. पडताळणी पूर्वी 4 हजार महिलांनी माघार घेतल्याची माहिती समोर आली आहे. पडताळणीत अपात्र ठरण्याची टांगती तलवार असल्याने ही माघार घेतल्याचं समजतंय.
योजनेचे लाभ थांबवण्यासाठी विनंती अर्ज शासकीय कार्यालयात दाखल झाले आहेत. ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारकडून काही निकष जाहीर करण्यात आले होते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या अर्जांची पडताळणी केली जाणार असल्याचे सांगण्यात येत होतं. मात्र, आता पडताळणी होण्याआधीच हजारो महिलांनी अर्ज माघारी घेण्यास सुरुवात केली आहे.
या योजनेच्या अर्जांची पडताळणी होण्याआधीच राज्यातील सुमारे 4 हजार महिलांनी आपला अर्ज या योजनेतून मागे घेतले आहेत. पैसे परत करावे या भीतीनं लाडक्या बहिणींनी अर्ज मागे घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आले आहे.
पात्रता निकषात न बसणाऱ्या बहिणींनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. अपात्र असूनही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याने सरकार आपल्यावर कारवाई करेल, अशी भीती महिलांच्या मनात निर्माण झाली असून त्यामुळे अनेक महिलांनी लाडकी बहीणसाठी केलेल अर्ज मागे घेण्यास सुरूवात केली आहे.
सुरुवातीला लाडकी बहीण योजनेत सरसकट पैसे मिळत होते, मात्र निवडणुकीनंतर या योजनेसाठी दाखल केलेल्या अर्जांची फेरतपासणी होणार याची चर्चा सुरू झाली.
पडताळणी सुरू झाल्यावर आपण अपात्र ठरलो तर मिळालेले पैसे परत द्यावे लागतील, अशी भीती महिलांच्या मनात आहे. त्यामुळेच आता अनेक महिलांनी त्यांचे अर्ज मागे घेतले आहेत. आम्हाला या योजनेचे पैसे नको, योजनेचे पैसे थांबवण्याची विनंती महिलांनी केली असून असे अनेक अर्ज शासकीय कार्यालयात दाखल झाले आहेत, अशी माहिती मिळाली आहे.
लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जाची पडताळणी केली जाणार आहे. यामध्ये लाखो महिला अपात्र ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याआधीच हजारो महिलांनी अर्ज मागे घेतले आहेत.
अपात्र लाडक्या बहिणींकडून दंडासह पैसे वसूल होणार? अदिती तटकरे काय म्हणाल्या ?
लाडकी बहीण योजनेत अपात्र असूनही लाभ घेतलेल्या महिलांकडून दंड वसूल करणार असल्याचीही चर्चा काही दिवसांपासून सुरू होती. मात्र आता यावर सरकारतर्फे स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. सरकार कुणाचेही पैसे माघारी घेणार नाही तसा सरकारचा कोणताही विचार नाही,असे अदिती तटकरे यांनी स्पष्ट केल्याची माहिती आहे.
ज्या महिलांनी चुकीच्या पद्धतीने अर्ज भरले त्यांनी स्वतःहून पैसे नको म्हणून अर्ज केले आहेत. सरकार कुणाचेही पैसे माघारी घेणार नाही, तसा सरकारचा कोणताही विचार नाही असे त्या म्हणाल्या. ज्या महिलांनी चुकीच्या पद्धतीने अर्ज भरले त्या आता अपात्र ठरतील, त्यांना या पुढे लाडकी बहीण योजनेचे हप्ते मिळणार नाहीत असेही त्यांनी स्पष्ट केलं.
जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात योजनेचा हफ्ता दिला जाईल, त्यावेळी लाभार्थ्यांची संख्या पूर्वीच्या तुलनेत कमी असणार आहे. सध्या कोणतेही नवीन निकष नाहीत असेही अदिती तटकरे म्हणाल्या.