लोणावळ्यात पर्यटकांची नेहमीच खूप गर्दी असते. याच लोणावळ्यातील प्रसिद्ध एका वडापाव दुकानात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
लोणावळ्यातल्या प्रसिद्ध उपहारगृहात उंदरांनी चावलेल्या बटाट्यांचे वडापाव आढळल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. लोणावळ्यामधील एका वडापावच्या किचनमध्ये स्वच्छतेच्या आणि आरोग्याच्या नियमांचं उल्लंघन होत असल्याचं या व्हिडीओमधून उघड झालं आहे.
या दुकानाच्या किचनमध्ये खूप घाण आणि उंदरांचा धुमाकूळ पहायला मिळाला. त्याचप्रमाणे साठवलेली अन्नसामग्री, जेवणासाठी वापरण्यात येणारी भांडी आणि पाणी अत्यंत वाईट अवस्थेत होते. धक्कादायक बाब म्हणजे काही सडलेले आणि उंदरांनी खाल्लेले बटाटे वडापाव बनवण्यासाठी वापरले जात होते.
या वडापावच्या किचनमध्ये आरोग्याच्या नियमांचं उल्लंघन होत असल्याचं तपासणीत उघड झालं. दुकानात साफसफाईकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं गेलं होतं. दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून स्वच्छतेचे कोणतेच नियम पाळले जात नव्हते. स्वयंपाकघरात झुरळं आणि उंदीर देखील फिरत होते.
मिळालेल्या माहितीनुसार , हे दुकान लोणावळ्यातील मध्यवर्ती भागात आहे. याच परिसरात अनेक हॉस्पिटल्स आहेत. त्यामुळे रुग्णांचे नातेवाईक, नर्स, डॉक्टर आणि पर्यटक इथं मोठ्या प्रमाणात खाण्यासाठी येतात. अशा ठिकाणी आरोग्याच्या नियमांचं उल्लंघन करणं धोक्याचं आहे.
“सडलेले आणि दूषित अन्नपदार्थ खाल्ल्यामुळे विषबाधा, जुलाब, उलटी, पोटदुखी तसंच काही वेळा जीवघेणा संसर्ग होऊ शकतो,” . विशेषतः पर्यटक आणि लहान मुलांसाठी हे खूप धोकादायक आहे. दुकानाच घाणीचं आणि अस्वच्छतेचं साम्राज्य असताना सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या तरुणाला या वडेवाल्यांनी दमदाटी केली. अखेर याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.