एसटी महामंडळाला विठुराया पावला! वारी काळात यंदा 'इतक्या' कोटींचे उत्पन्न
एसटी महामंडळाला विठुराया पावला! वारी काळात यंदा 'इतक्या' कोटींचे उत्पन्न
img
Dipali Ghadwaje
विठ्ठलाच्या सेवेमुळे यंदा एसटी महामंडळाच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे. यंदा वारीसाठी लाखो वारकऱ्यांनी एसटीने प्रवास केला. 

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या वारीसाठी एसटी महामंडळाकडून विशेष बस सोडण्यात आल्या होत्या .९ लाख ७१ हजार भाविकांनी यंदा एसटीने प्रवास केला. त्यामुळे महामंडळाला ३५ कोटी ८७ लाख रूपयांचे उत्पन्न मिळाले.

पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, संभाजीनगरसह राज्यातील प्रत्येक एसटी विभागातून वारीसाठी स्पेशल एसटी बसेसची सोय करण्यात आली आहे. त्यामधून कोट्यवधींचे उत्पन्न मिळाल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.

आषाढी यात्रेनिमित्त एसटी महामंडळाकडून ५२०० जादा बसेस पंढरपूरसाठी पाठवण्यात आल्या होत्या. त्या माध्यमातून एसटीने तब्बल ९ लाख ७१ हजार ६८३ भाविक - प्रवाशांची सुरक्षित ने-आण करून त्यांना विठ्ठल दर्शन घडविले. 

या सेवेतून एसटीला ३५ कोटी ८७ लाख ६१ हजार रुपये उत्पन्न मिळाले, अशी माहिती परिवहन मंत्री, एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक काय म्हणाले?

मंत्री सरनाईक म्हणाले की, आषाढी यात्रेनिमित्त अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठुरायाच्या दर्शनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून पंढरपूर येथे मोठ्या संख्येने भाविक -प्रवाशी येत असतात. या भाविक- प्रवाशांना त्यांच्या गावापासून पंढरपूरपर्यंत ने-आण करण्यासाठी एसटीने तब्बल ५ हजार २०० जादा बसेस सोडल्या होत्या.

३ ते १० जुलै दरम्यान या बसेसनी २१ हजार ४९९ फेऱ्या करून तब्बल ९ लाख ७१ हजार ६८३ भाविक - प्रवाशांची सुरक्षित ने-आण केली आहे.

यातून एसटी महामंडळाला ३५ कोटी ८७ लाख ६१ हजार रुपये इतके उत्पन्न मिळाले आहे. जे मागील वर्षी मिळालेल्या उत्पन्नापेक्षा ६ कोटी ९६ लाख ३ हजार रुपयांनी जास्त आहे. २०२४ साली आषाढी यात्रेचे एकूण उत्पन्न २८ कोटी ९१ लाख ५८ हजार रुपये इतके होते.
इतर बातम्या
Join Whatsapp Group