शिर्डीत भारतीय जनता पक्षाचं महाअधिवेशन सुरु आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आणि मंत्री या महाअधिवेशनाला उपस्थित राहिले आहेत. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींबाबत मोठं विधान केलं.
महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना १५०० रुपये मिळतात. विधानसभा निवडणुका झाल्यावर लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याच्या चर्चा सुरु होता. तसेच विरोधी पक्षांनीदेखील लाडकी बहीण बंद करणार असल्याचे आरोप लावले होते. आता याच आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिले आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, महिला आणि दलितांसाठी राबवण्यात येणाऱ्या सर्व योजना यापुढेही सुरु राहतील. जाहीनाम्यात दिलेल्या आश्वसनांबाबतही त्यांनी आपले मत मांडले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितले की,आम्ही लाडकी बहीण योजना आणि इतर योजना बंद करणार असल्याच्या अफवा आहेत. मला हे स्पष्ट करायचे आहे की, महिला आणि दलित लोकांच्या हितासाठी राबवण्यात आलेली प्रत्येक योजना सुरु राहील. सध्याच्या योजनांव्यतिरिक्त आम्ही आमच्या जाहिरनाम्यात दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करु, असं त्यांनी म्हटलं आहे.
लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र, या अफवा खोट्या असल्याचे आता सांगितले आहे. याआधीही महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजना बंद होणार नसल्याचे सांगितले होते. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीसांनी देखील लाडकी बहीण योजना सुरु राहणार असल्याचे सांगितले आहे.
लाडकी बहीण योजनेत आता महिलांच्या अर्जांची पडताळणी सुरु आहे. या योजनेत अपात्र महिलांचे अर्ज बाद केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. या योजनेत ज्या महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त आहे त्यांना लाभ मिळणार नाही. सरकारी नोकरी आणि आयकर रिटर्न भरणाऱ्या कुटुंबातील महिलांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही.