मुंबईतील वरळी येथील एनएससीआय डोम येथे महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. मात्र काही काळासाठी या कार्यक्रमात चांगलाच गोंधळ झाल्याचे पहायला मिळाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण सुरू होताच, एका हिंदू संघटनेचे दोन कार्यकर्ते अचानक व्यासपीठासमोर आले आणि त्यांनी ‘खालिद का शिवाजी’ या चित्रपटाविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली. ‘इतिहासाचं विकृतीकरण थांबवा’ अशी मागणी करणाऱ्या दोन आंदोलकांनी कार्यक्रमात गोंधळ घातला. कार्यकर्त्यांनी चित्रपटावर बंदी घालण्याची आणि त्यातील कथित आक्षेपार्ह दृश्य हटवण्याची मागणी केली.
या अचानक झालेल्या घोषणाबाजीमुळे सोहळ्याचे वातावरण काही काळासाठी तणावपूर्ण झाले. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपलं भाषण काही क्षणांसाठी थांबवावं लागलं.सुरक्षारक्षकांनी तत्काळ हस्तक्षेप करून या कार्यकर्त्यांना कार्यक्रमस्थळाबाहेर नेले. या घटनेनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी संयम राखत, “तुमचं म्हणणं ऐकलं, पण कार्यक्रमात गोंधळ नको,” असं आवाहन केलं.
चित्रपटाला विरोध का ?
‘खालिद का शिवाजी’ या चित्रपटावर सध्या तीव्र वाद सुरू आहे. या चित्रपटाला होणाऱ्या विरोधामागचं मुख्य कारण म्हणजे चित्रपटाचं नाव आणि त्यामधील कथित कथा. निषेध करणाऱ्या हिंदू संघटनांनी, या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं विकृतीकरण करण्यात आलं आहे. त्यांच्या मते, चित्रपटाच्या माध्यमातून जातीय तणाव निर्माण होईल, आणि समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न होतो असल्याचा दावा केला आहे. इतिहास चुकीच्या पद्धतीने सादर करण्यात आला, तर समाजात गोंधळ, वाद आणि असंतोष वाढू शकतो. त्यामुळे या चित्रपटाचं प्रदर्शन थांबवावं आणि त्यावर बंदी घालावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.