राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोरदार सुरु आहे. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या भूमिकेचं सर्वच राजकीय पक्षांनी स्वागत केलं आहे. या प्रस्तावावर मनसे आणि ठाकरे गटाकडून सकारात्मक प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
राज ठाकरेंच्या साद आणि उद्धव ठाकरेंच्या प्रतिसादावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मतभेद विसरून एकत्र येत असतील तर वाईट वाटण्याचे कारण नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू एकत्र आल्यास महायुतीला धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मात्र, दुसरीकडे दोन्ही बंधू एकत्र येण्याच्या भूमिकेचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर आम्हाला आनंद आहे. कोणीही मतभेद विसरून एकत्र येत असतील तर वाईट वाटण्याचे कारण नाही. माध्यमे यावर जास्त विचार करत आहे.
राज ठाकरे यांना युती प्रस्तावावर उद्धव ठाकरे यांनी अट देखील ठेवली आहे. उद्धव ठाकरे यांच्या अटीवर फडणवीस म्हणाले, 'ऑफर देणारे हे प्रतिसाद देणार ते. मी काय बोलणार, ही बाब त्यांना विचारा'. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिक्रियेनंतर आता ठाकरे गट आणि मनसेकडून काय प्रतिक्रिया दिली जाते, हे पाहावे लागेल.