मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठी 29 ऑगस्ट रोजी मुंबई आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गावागावांमध्ये चावडी बैठकींचे आयोजन करण्यात येत आहे. याच अनुषंगाने आज धाराशिव शहरात बैठक पार पडली. या बैठकीत मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी राजकीय नेत्यांना इशारा दिला आहे.
जो नेता 29 ऑगस्टला मुंबईच्या आंदोलनात सहभागी होणार नाही, त्याला आगामी महानगरपालिका, नगरपालिका, पंचायत समिती निवडणुकांमध्ये पाडा, असे आवाहन या बैठकीत त्यांनी मराठा समाजाला केले आहे. मनोज जरांगे यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान मनोज जरांगेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना थेट इशारा दिला आहे.
अंतरवाली सराटीत झालेली चूक पुन्हा करू नका, तुम्ही जर काही भानगड करायला जाल तर त्याची किंमत तुमच्यासह पंतप्रधानांना देखील भोगावी लागेल, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. मराठ्यांच्या नादी लागायचं नाही, गोडी गुलाबीने तुम्हाला जे करायचं ते करायचं, त्यावेळेस घडलं ते घडलं. आता पुन्हा त्या भानगडीत पडायचं नाही. ही धमकी नाही तुम्हाला मी हे समजून सांगतो, कारण तुम्हाला ती खोड आहे.
आई-बहीण, पोरांवर हात पडला तर मराठे कोणत्याही टोकाला जातील, तुमच्यामुळे देशातल्या पंतप्रधान मोदी साहेबांसहित सरकारला सुद्धा हादरा बसेल. मराठे वेळोवेळी मार खायला मोकळे नाहीत, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.