श्रावणी सोमवार निमित्त नालासोपारा येथून विरार पूर्वेकडील मांडवी परिसरातील तुंगारेश्वर, येथे कावड यात्रा निघाली होती. या कावड यात्रेत नालासोपारा पूर्व श्रीराम नगर परिसरातील रहिवासी असलेले सचिन यादव, हिमांशू विश्वकर्मा आणि त्यांचे मित्र असा सहा जणांचा एक ग्रुप सहभागी झाला होता. देवाचे दर्शन घेऊन जेवण करून परतीचा प्रवास करत असताना तुंगारेश्वर येथे नदीच्या पाण्यात उतरण्याचा मोह या तरुणांना आवरता आला नाही.
या तरुणांपैकी एक तरुण पाण्यात जात असताना त्याचा पाय घसरला आणि त्याचा धक्का दुसऱ्या तरुणाला लागल्याने दोघेही नदीच्या पाण्यात पडले.नदीत पडलेल्या दोघांना वाचवण्यासाठी एक मित्र प्रयत्न करू लागला, मात्र तोही बुडू लागला. सुदैवाने इतर तरुणांनी त्याला पाण्याबाहेर काढले.सोमवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
हे ही वाचा !
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले व बचाव कार्य हाती घेण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून घटनेची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. कावड यात्रेसाठी गेलेल्या सचिन यादव (वय 18), हिमांशू विश्वकर्मा (वय 18) या दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.