नाशिकमधील एका कार्यक्रमात बोलत असताना शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक, अध्यक्ष संभाजी भिडे यांनी पुन्हा वादग्रस्त विधान केले आहे. सर्वधर्म समभाव म्हणजे नीचपणा आहे. हा प्रकार म्हणजे ना धड स्त्री, ना धड पुरुष म्हणजे नपुंसकपणा आहे, असे विधान संभाजी भिडे यांनी केले आहे.
यावेळी संभाजी भिडे यांनी पुन्हा एका त्यांच्या 'आंबा खाऊन मुलं होतात', या वक्तव्याचा उच्चार केला. मी आंबे खाऊन मुल होतं, असे बोललो होतो. मी एक आंब्याचं झाड लावलं आहे. तिथे आजही तुम्ही जाऊन आंबे खाऊ शकता. त्या वक्तव्यावरुन माझ्यावर कोर्टात खटला सुरु आहे, असे संभाजी भिडे यांनी म्हटले.
पंधरा ऑगस्टला तिरंगा फडकवण्यासोबतच लाल किल्ल्यावर भगवा ध्वज फडकवण्यासाठी काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले. सगळ्यांमध्ये सामील होऊन तिरंगा फडकवू, पण डोक्यात हिरोजी फर्जंदने सांगितले ते काम ठेवू, असेही ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यांमुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.