रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानून मागील 33 वर्षांपासून काम करणाऱ्या डॉ. निवेदिता पवार यांचे सामाजिक क्षेत्रातील योगदानही तितकेच बहुमूल्य आहे. आपला वैद्यकीय व्यवसाय सांभाळताना विविध सामाजिक संस्थांवर त्या कार्यरत आहेत. वेगवेगळे उपक्रम त्यांच्या माध्यमातून राबविले जातात. याचा समाजातील गोरगरिबांना चांगला लाभ मिळत आहे.
एमडी गायनॅकोलॉजिस्ट असलेल्या डॉ. निवेदिता आनंद पवार या मूळ छत्रपती संभाजीनगर येथील आहेत. त्यांचे शिक्षण छत्रपती संभाजीनगर येथेच झाले. आईवडील दोघे उच्चशिक्षित असून, त्यांचे भाऊ आणि बहीण हेही उच्चशिक्षित आहेत. मागील 33 वर्षांपासून त्या नाशिक येथे स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून प्रॅक्टिस करतात. कॉलेजरोडला त्यांचे निवेदिता हॉस्पिटल आहे. त्यांना दोन मुले असून ते दोघेही डॉक्टर आहेत. त्यांची मुलगीही स्त्रीरोगतज्ज्ञ आहे, तर मुलाचे शिक्षण सुरू आहे. आपल्या वैद्यकीय व्यवसायाबरोबरच निवेदिता पवार या वेगवेगळ्या सामाजिक कार्यांसाठीही प्रसिद्ध आहेत. आयएमए नाशिक शाखेचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. याशिवाय रोटरी क्लब ऑफ कॅनडा कॉर्नरचे अध्यक्ष पदही त्यांनी भूषविले आहे. प्रसूती व स्त्रीरोग संघटना, नाशिकच्या त्या माजी अध्यक्षा आहेत.
आयएमएच्या माध्यमातून त्यांनी डॉक्टरांसाठी विविध कार्यक्रम राबविले आहेत. त्या रोटरी क्लबच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवित असतात. आदिवासी भागात विशेषतः पेठ व सुरगाणा यांसारख्या तालुक्यांमध्ये जाऊन त्या रुग्णांची तपासणी करीत असतात. गरजू रुग्णांना कमी खर्चात उपचार कसे उपलब्ध होतील याविषयी ही त्या नेहमी प्रयत्नशील असतात. त्यांच्या रुग्णालयामार्फतही स्त्रियांच्या आजाराविषयी त्या काम करत असतात. दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, सोनोग्राफी सेंटर त्या चालवितात. एखाद्या महिलेला गर्भधारणा होत नसेल, तर फर्टिलिटी ट्रीटमेंटही त्या करीत असतात.डॉ. निवेदिता पवार या वंध्यत्वाचा सामना करणाऱ्या जोडप्यांसाठी आशेचा किरण आहेत.
आजच्या समाजात हे एक मोठे आव्हान आहे. वंध्यत्व हा केवळ स्त्रियांचा प्रश्न आहे असे नाही, तर पुरुषांचाही असतो, असे त्या मानतात. हा प्रश्न विशेषतः स्थूल जीवनशैली, ताणतणाव, धूम्रपान किंवा व्यसनामुळे निर्माण होतो. निवेदिता हॉस्पिटल अमेरिका आणि जर्मनीतील आधुनिक उपकरणांनी सज्ज असून, त्या माध्यमातून वंध्यत्व उपचार व समुपदेशनापासून लॅप्रोस्कोपी आणि एण्डोस्कोपी शस्त्रक्रियेपर्यंत विस्तृत सेवा त्या पुरवितात. त्यांच्या विविध सेवांमुळे जोडप्यांना पालकत्वाकडे जाणारा प्रवास शक्य आणि सुकर होतो. हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या आरोग्य आणि तणावमुक्त वातावरणाचे महत्त्व समजावले जाते.
प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीपश्चात स्त्रियांच्या आजाराविषयी त्या मार्गदर्शन आणि उपचार करत असतात. वैद्यकीय क्षेत्रातील आपले ज्ञान वेळोवेळी अद्यावत करण्यासाठी त्या डॉक्टरांचे होणारे चर्चासत्र याशिवाय वेगवेगळ्या देशांमध्ये होणाऱ्या परिषदा येथेही त्या जात असतात. त्या माध्यमातून आपल्या क्षेत्रात कोणते नवीन बदल होत आहेत, त्याचा फायदा आपल्या रुग्णांना कसा देता येईल, यासाठी त्या प्रयत्नशील असतात.
या कामगिरीच्या जोरावरच डॉ. निवेदिता पवार यांना वैद्यकीय क्षेत्रातील विविध पुरस्कारदेखील मिळालेले आहेत. विशेष म्हणजे वैद्यकीय शास्त्राबरोबरच डॉ. निवेदिता पवार यांनी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयाची पदविका मिळविली आहे. स्त्रीला पौगंडावस्थेपासून ते मातृत्व आणि त्या पुढील काळात वैयक्तिक आणि करुणामय काळजी पुरविण्याचे त्यांचे काम निश्चितच प्रेरणादायी आहे.