नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- व्हॉट्सअॅपवर ग्रुपची लिंक पाठवून शेअर्स व आयपीओमध्ये कमिशन देण्याचे आमिष दाखवून चौघांची 28 लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार सायबर पोलीस ठाण्यात दाखल आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की फिर्यादी व इतर तीन तक्रारदार यांना दि. 21 जून ते 24 ऑगस्ट 2025 या दोन महिन्यांच्या कालावधीत अज्ञात आरोपीने व्हॉट्सअॅपवर टेलिग्रामची लिंक पाठविली. त्यानंतर आरोपीने फिर्यादी यांना रिअल्टर्स सर्कल 9885 या ग्रुपमध्ये अॅड केले. त्या ग्रुपमध्ये एक लिंक पाठवून त्याने फिर्यादी व इतर तिघा तक्रारदारांना विविध कंपन्यांचे शेअर्स व आयपीओ खरेदी करण्याचे आमिष दाखवून कमिशन मिळत असल्याचे भासविले.
आरोपीने चौघांकडून विविध बँक खाती व यूपीआयडीवर पैसे मागविले. या आमिषाला बळी पडून एकाने 7 लाख 15 हजार 482 रुपये, दुसर्याने 9 लाख 1 हजार 545 रुपये, तिसर्याने 6 लाख 14 हजार 999 रुपये व चौथ्याने 5 लाख 67 हजार 792 रुपये असे चौघांनी मिळून एकूण 27 लाख 99 हजार 818 रुपये आरोपीने सांगितलेल्या खात्यांवर भरले. पैसे भरूनदेखील कोणताच परतावा न आल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक पाटील करीत आहेत.