नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) : नाशिकमध्ये एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. फेसबुकवर विवाहितेशी मैत्री करत एका भामट्याने तब्बल १६ लाखांची फसवणूक केली आहे. फेसबुकवरून मैत्री केल्यानंतर स्वत:चा अपघात, मुलीची होस्टेलची फी अशी वेगवेगळी कारणे सांगून एका विवाहितेची १६ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक करणार्या भामट्या मित्राविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे ही वाचा
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी महिला ही ३५ वर्षीय असून, ती जेलरोड परिसरात राहते. १० मे ते ११ जुलै या दोन महिन्यांच्या काळात अज्ञात इसमाने पीडित महिलेशी फेसबुक व व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून संपर्क साधून मैत्री करीत असल्याचे भासवले. पीडितेचा विश्वास संपादन करून स्वत:चा अपघात आणि मुलीच्या होस्टेलची फी अशी वेगवेगळी कारणे सांगून या मित्राने पीडितेकडे पैशांची मागणी केली.
हे ही वाचा
त्यानंतर पीडितेने त्याच्यावर विश्वास ठेवून एसबीआय व आयसीआयसीआय बँकेच्या खात्यातून यूपीआय आणि एनईएफटीद्वारे आरोपीच्या बँक खात्यावर एकूण 16 लाख 35 हजार रुपये वर्ग करण्यास भाग पाडले. त्यानंतर आरोपीने पीडितेशी संवाद कमी केला. त्यावेळी आपली फसवणूक झाल्याची बाब पीडितेच्या लक्षात आली. तिने सायबर पोलीस ठाणे गाठून अज्ञात मित्राविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक पाटील करीत आहेत.