रील बनवले की नाव ठेवणारे अनेक लोक समोर येतात. हो पण विषय चांगला असेल तर कौतुकही होतं बरं का ? आणि महाराष्ट्र सरकार आयोजित विशेष स्पर्धेत तुम्ही भाग घेतला तर तुम्हाला तब्बल एक लाख रुपये बक्षीस जिंकण्याची संधी देखील मिळणार आहे. करायचं काय तर दिलेल्या विषयावर फक्त रील बनवायचं आहे.
राज्यातील महसूल विभागीय स्तर , राज्यस्तर आणि महाराष्ट्राबाहेर व भारताबाहेरील खुला गट अशा तीन गटात स्पर्धा होईल. रीलसाठी पर्यावरण संवर्धन, स्वदेशी, गडकिल्ले, संस्कृती, ऑपरेशन सिंदूर या थीम मध्यवर्ती ठेवून ३० सेकंद ते ६० सेकंदापर्यंत रील बनविणे अपेक्षित आहे. या स्पर्धेत सहभागासाठी २७ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन नाव नोदणी आणि रील अपलोड करायचे आहेत.
हे ही वाचा
स्पर्धेची नोंदणीकरिता गुगल फॉर्म तयार करण्यात आला असून filmcitymumbai.org या संकेतस्थळावर तसेच महामंडळाच्या सोशल मीडिया हँडल्सवर उपलब्ध आहे, असे दादासाहेब फाळके चित्रनगरीकडून कळविण्यात आले आहे.
सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड .आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून यंदा गणेशोत्सवाला रील स्पर्धेच्या माध्यमातून देश-विदेशात नवे आयाम मिळणार आहेत. यंदा प्रथमच महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्यावतीने रील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
हे ही वाचा
पारितोषिक
या स्पर्धेतील राज्यस्तरावरील प्रथम क्रमांकाच्या विजेत्यास १ लाख रुपये, द्वितीय पारितोषिक म्हणून ७५ हजार रुपये, तृतीय पारितोषिक म्हणून ५० हजार रुपये, उतेजनार्थ पारितोषिक म्हणून २५ हजार रुपये देण्यात येईल.
महसूल विभागीय स्तरावरील विजेत्या स्पर्धकाला प्रथम पारितोषिक म्हणून २५ हजार रुपये, द्वितीय पारितोषिक रुपये १५ हजार, तृतीय पारितोषिक १० हजार, उतेजनार्थ विजेत्यास ५ हजार अशा स्वरुपात पारितोषिक दिले जाईल.
हे ही वाचा
तर महाराष्ट्र व भारताबाहेरील विजेत्या गटातील स्पर्धकाला प्रथम क्रमांकाचे १ लाख रुपये बक्षीस, द्वितीय क्रमांकासाठी ७५ हजार रुपये, तृतीय क्रमांकासाठी ५० हजार रुपये, उतेजनार्थ म्हणून २५ हजार रुपये देण्यात येतील.