बिहारमधील बेगुसराय येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इन्स्टाग्राम रील बनवण्यापासून रोखलं म्हणून पत्नीने कुटुंबियांच्या मदतीने पतीलाच जीवे मारल्याची घटना उघडकीस आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी ७ जानेवारी रोजी घडली असून आरोपी महिलेला इंस्टाग्राम रील्स बनवण्याची आवड होती. मात्र तिच्या पतीला ही गोष्ट आवडत नव्हती. पतीने विरोध केला आणि तिला रील बनवण्यापासून रोखले. यावरुन महिलेचा राग अनावर झाला आणि तिने नातेवाईकांच्या मदतीने पतीची हत्या केली. महेश्वर कुमार असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
महेश्वर कोलकाता येथे मजुरीचा काम करत होता. काही दिवसांपूर्वीच तो आपल्या गावी नरहान येथे आला होता. कोलकात्याला जाण्यापूर्वी महेश्वर पत्नीला भेटण्यासाठी सासरच्या घरी गेला होता. तेथे पत्नी व सासरच्यांनी त्याची गळा आवळून हत्या केल्याचा आरोप आहे. रविवारी रात्री महेश्वरच्या भावाने कोलकाता येथून महेश्वरला फोन केला होता. त्यावेळी फोन अन्य कुणीतरी उचलला तेव्हा ही घटना उघडकीस आली.
संशयावरून महेश्वरच्या भावाने वडिलांना फाफौत गावात पाठवले असता महेश्वर मृतावस्थेत आढळून आला. त्यानंतर खोदवंदपूर पोलीस ठाण्याच्या याबाबत माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस दाखल झाले, त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला.
त्यानंतर महेश्वरच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी पत्नीला अटक केली. Reels व्हिडिओ बनवण्यास विरोध केल्यामुळे महेश्वरला त्याची पत्नी आणि सासरच्या लोकांनी जीवे मारल्याचा आरोप मृताच्या कुटुंबीयांनी केला आहे. सध्या पोलिसांनी आरोपी पत्नीला ताब्यात घेतले असून तिची चौकशी सुरू आहे. पोलिस अधिक तपास करत आहे.