सातपूर : शिवाजीनगर परिसरातील अवधूत गड ( फाशीच्या डोंगर) वन परिसरात शनिवारी सकाळी एका प्रौढ बिबट्याचा मृतदेह आढळून आला. प्राथमिक चौकशीत बिबट्याचा मृत्यू विजेचा शॉक लागल्याने झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फाशीच्या डोंगर परिसरात अनेकदा बिबटे दिसून येतात. पाण्याच्या आणि अन्नाच्या शोधात हे प्राणी मानवी वस्त्यांच्या जवळ भटकंती करतात. शनिवारी सकाळी स्थानिक नागरिकांना डोंगराच्या उतारावर बिबट्याचा मृतदेह दिसला. त्यांनी तात्काळ याबाबत वनविभागाला माहिती दिली.
वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. तपासात बिबट्याला वीजेच्या तारांचा शॉक बसल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक निष्कर्ष समोर आले आहेत.
सदर ठिकाणी वीज तारेला मृत अवस्थेत घुबड शॉक लागून लटकले होते. त्याच्या वासाने शिकारी च्या शोधात बिबट्या झाडावर चढला. परंतु शिकार करण्याच्या प्रयत्नात बिबट्या ला विजेचा शॉक जमिनीवर कोसळला. यात त्याचा मृत्यू झाल्याची माहिती वनरक्षक खुशाल पावरा यांनी दिली. मृत बिबट्याचे शवविच्छेदन करून पुढील तपासासाठी नमुने गोळा करण्यात आले आहेत.
या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. सातपूर परिसरात बिबट्यांची वाढती वर्दळ लक्षात घेता वनविभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.