निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करताच आचारसंहिता देखील लागू झाली आहे. आचारसंहिता काळात कुठलेही गौरव्यवाहार होऊ नयेत यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेण्यात येत असून, नाक्या-नाक्यावर वाहनांची तपासणी सुरू होत आहे.
राज्यात सध्या आचारसंहिता सुरु आहे. २३ तारखेला महाराष्ट्रात कुणाचं सरकार येणार? यावर शिक्कामोर्तब होईल. त्याआधी सध्या राज्याच प्रचाराचा धुरळा उडाला आहे. हे सर्व सुरु असतानाच पोलिसांची करडी नजर आहे, जागोजागी चेकपोस्ट लावण्यात आलेत. पोलिसांनी धडक कारवाई करत गेल्या काही दिवसांत कोट्यवधी रुपये जप्त केले आहेत.
भुलेश्वर आणि शिवडीमध्ये आज सकाळी जवळपास चार ते पाच कोटींचा मुद्देमाल जप्त केला होता. त्यात आता विरारची भर पडली आहे. विरारमध्ये आज दोन कोटी रुपये जप्त केल्याची माहिती मिळाली आहे.
निवडणूक काळात वसई विरार शहरात पैशांचा पाऊस सुरूच आहे. शुक्रवारी सलग दुसर्या दिवशी विरार २ कोटी रुपयांची रोकड पालिकेच्या भरारी पथकाने जप्त केली आहे. गुरूवारी देखील नालासोपारा, मांडवी आणि मिरा रोड मध्ये ७ कोटी ८० लाखांची रोकड जप्त करण्यात आली होती. बँकेच्या एटीएम व्हॅन मधून या बेहिशोबी पैसे नेण्यात येत होते.
एका बँकेच्या एटीएम व्हॅन मधून बेहिशोबी पैसे नेले जात असल्याची माहिती वसई विरार महापालिकेच्या भरारी पथकाला मिळाली होती. शुक्रवारी सकाळी ११ च्या सुमारास विरार पश्चिमेच्या भाजी मार्केट परिसरात सापळा लावून बँकेची एटीएम व्हॅन ताब्यात घेतली. या व्हॅन मध्ये २ कोटींहून अधिक रुपयांची रोकड आढळली आहे.
बँकेच्या व्हॅनमधून मिळालेल्या या रकमेची कुठलाही अधिकृत कागदपत्रे संबंधितांकडे नाहीत. ही रोकड जप्त करण्यात आली असून आयकर विभागाला पुढील कारवाईसाठी प्रकरण सोपवण्यात आले आहे.