इंदिरानगर बोगद्याजवळ कर्तव्य बजावताना पोलीस कर्मचार्‍याला चौघांकडून मारहाण
इंदिरानगर बोगद्याजवळ कर्तव्य बजावताना पोलीस कर्मचार्‍याला चौघांकडून मारहाण
img
Dipali Ghadwaje
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- कर्तव्यावर असणार्‍या पोलीस अंमलदाराला चौघांनी मारहाण करून जखमी केल्याची घटना इंदिरानगर बोगद्याजवळ आज दुपारी घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की केंद्रीय गृहमंत्री हे आज दुपारी नाशिक दौर्‍यावर आहेत. त्या बंदोबस्तासाठी पोलीस अंमलदार नाझिम शेख हे इंदिरानगर बोगद्याजवळ आपले कर्तव्य बजावत होते. त्यावेळी एका गाडीमधील एक महिला व तीन पुरुष हे त्यांच्या कर्मचार्‍याला मारहाण करीत होते. तो कर्मचारी पोलिसांजवळ येऊन “मला वाचवा,” असे म्हणत तो बचाव करण्यासाठी अंमलदाराकडे धावत गेला. शेख यांनी त्यास तक्रार देण्यासाठी मुंबई नाका पोलीस ठाण्यात चल, मी पण येतो, असे सांगितले. 

त्यावेळी गाडीतून आलेल्या महिलेसह चौघांनी कर्मचार्‍याला मदत करतो, म्हणून शेख यांनाही मारहाण करण्यास सुरुवात केली. ही घटना घडत असताना रस्त्यावरील नागरिक मध्ये पडले. त्यांनी त्या पोलीस कर्मचार्‍याला चौघांच्या तावडीतून सोडविले. त्यावेळी तीन जण पळून जाण्यात यशस्वी झाले; मात्र पोलिसांनी महिलेला ताब्यात घेत मुंबई नाका पोलिसांच्या हवाली केले. 

या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. हे चौघेही नशेत असल्याचे समजते. ताब्यात घेतलेली महिला ही नाशिकमधील एका सराफ व्यावसायिकाची सून असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group