डेहरादून : उत्तराखंडमध्ये रविवारी एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली. भाजपच्या एका माजी आमदाराने विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार केला. सोशल मीडियावर सुरू असलेल्या वादातून ही घटना घडल्याचे समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून , पोलिसांनी घटनास्थळी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , भाजपचे माजी आमदार कुंवर प्रणव सिंह चॅम्पियन हे आपल्या समर्थकांसह तीन वाहनांतून खानपूरचे विद्यमान आमदार उमेश कुमार यांच्या कार्यालयाजवळ पोहोचले. त्यांच्या समर्थकांकडे शस्त्रे होती. कार्यालयाजवळ पोहोचताच त्यांनी उमेश कुमार यांच्या कार्यालयावर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.
यापूर्वी काही दिवसांपासून सोशल मीडियावर उमेश कुमार आणि कुंवर प्रणव सिंह चॅम्पियन यांच्यात शाब्दिक वाद सुरू होता. रविवारी या वादाला हिंसक वळण मिळाले.
गोळीबाराचा आवाज ऐकून संतप्त झालेले आमदार उमेश कुमार यांनीही पिस्तुलामधून गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी आणि उपस्थितांनी त्यांना वेळीच रोखले. या घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत कुंवर प्रणव सिंह चॅम्पियन यांना अटक केली आणि त्यांना हरिद्वार पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणाचा पोलिस कसून तपास करत आहेत. एखाद्या विद्यमान आमदारावर अशाप्रकारे हल्ला होण्याची ही कदाचित पहिलीच घटना आहे. या घटनेमुळे उत्तराखंडमधील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.