सध्या सेलिब्रिटींच्या फार्महाऊस सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले असून, अशातच बॉलिवूड अभिनेत्री संगीता बिजलानी यांच्या तिकोना पेठ (ता. मावळ) येथील पवना धरणाच्या बॅक वॉटरलगत असलेल्या फार्महाऊसवर चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार चोरट्यांनी रात्रीच्या वेळी फार्महाऊसच्या मागील बाजूने प्रवेश करत ग्रील तोडून घरात प्रवेश केला आणि रोख रक्कम व टीव्ही असा सुमारे 57 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
या घटनेनंतर मोहम्मद अझहरुद्दीन यांचे पी.ए. मोहम्मद मुजीब खान यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, फार्महाऊसमधून 50 हजार रुपयांची रोख रक्कम आणि सुमारे 7 हजार रुपये किमतीचा टीव्ही चोरीला गेला आहे.
संबंधित फार्महाऊस अभिनेत्री संगीता बिजलानी आणि माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझहरुद्दीन यांच्या मालकीचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. या परिसरात अशा प्रकारच्या चोरीच्या घटना क्वचितच घडतात, त्यामुळे स्थानिकांमध्येही ही घटना चर्चेचा विषय ठरली आहे.
लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे या प्रकरणाचा तपास करत असून, सीसीटीव्ही फुटेज, परिसरातील हालचाली आणि संभाव्य संशयितांवर लक्ष केंद्रित केले जात आहे.