कात्रज येथील गंधर्व लॉन्स परिसरात वाहतूक नियमन करत असतानाच एका वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, धनंजय वणवे (42) असं मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. बुधवारी दुपारच्या सुमारास धनंजय वणवे हे गंधर्व लॉन्स परिसरात वाहतूक नियमन करत असताना अचानक खाली कोसळले.
ते खाली पडल्याचं दिसताच त्यांना तातडीने कात्रज चौकातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. वणवे यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मात्र, त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे मृत्यू झाल्याचा डॉक्टरांचा अंदाज आहे. दरम्यान, त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
कोण होते धनंजय वणवे?
धनंजय वणवे हे पुरंदर तालुक्यातील तोंडल गावचे रहिवासी होते. त्यांच्या निधनाने पुणे वाहतूक पोलिस विभागावर शोककळा पसरली आहे. शिवाय कर्तव्य करत असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.