चंदीगड : दुचाकीवरून गोणी वाहत नेत असलेल्या दोन तरुणांनी 'गोणीत सडलेले आंबे आहेत' असं सांगून परिसरातील लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, उपस्थित नागरिकांना संशय आल्याने त्यांनी दोघांना थांबवले. अधिक चौकशी सुरू होताच दोघांनी गोणी रस्त्यावर टाकली आणि दुचाकीवरून पळून गेले. जेव्हा ती गोणी उघडण्यात आली, तेव्हा त्यातून एका महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली.
हा धक्कादायक प्रकार चंदीगडमधील लुधियानाच्या आरती चौकात बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास घडला.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , फिरोजपूर रोडवरील दुभाजकाजवळ दोघे अनोळखी तरुण निळ्या रंगाच्या पल्सर दुचाकीवर आले होते. त्यांच्या हातात एक मोठी गोणी होती. त्यांनी ती गोणी दुभाजकावर ठेवली आणि निघून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, परिसरातील दुकानदार आणि फेरीविक्रेते यांनी त्यांच्या हालचालींवर संशय आला. त्यांनी गोणीत काय आहे, अशी विचारणा केली असता, तरुणांनी "सडलेले आंबे आहेत, वास येतोय म्हणून टाकायला आलो आहोत," असं सांगून वेळ मारण्याचा प्रयत्न केला.
मात्र तरीही लोकांना त्यांच्या वागण्यावर संशय आला. एका प्रत्यक्षदर्शींनी गोणीत हात घालून पाहिलं असता त्यांना आत माणसाचा किंवा प्राण्याचा मृतदेह असल्याचा संशय आला. त्याचवेळी काहींनी व्हिडीओ रेकॉर्डिंगही केलं. एक आरोपी सुरक्षा रक्षकाच्या गणवेशात होता, अशी माहितीही समोर आली आहे. अखेर पोलिसांना बोलावण्यात आलं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "गोणीत एका महिलेचा मृतदेह होता. तिच्या नाकातून रक्तस्राव होत होता. आरोपींची पल्सर दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतली असून, तिच्या नंबरवरून आरोपींचा शोध घेतला जात आहे. मृत महिलेची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत."
आणखी एका प्रत्यक्षदर्शीनं या घटनेबाबत दिलेल्या माहितीनुसार, दुसरा आरोपी सुरक्षा रक्षकाच्या गणवेशात आला होता.
दरम्यान ही घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, आरोपी लवकरच पोलिसांच्या तावडीत येतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. मृत महिलेच्या मृत्यूमागील नेमकं कारण, हत्या की अपघात, हे तपासातून स्पष्ट होणार आहे.