मुंबईत फिरणाऱ्या केसकापू माथेफिरूमुळे महिला-मुलींमध्ये दहशतीचे वातावरण पसरले होते. अखेर त्या माथेफिरू इसमाला पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , दिनेश गायकवाड ( वय 35) असे आरोपीचे नाव असून तो चेंबूर येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.
‘महिलांचे लांब केस आवडत नाहीत, म्हणूनच आपण हे कृत्य केले’ अशी धक्कादायक कबुली या आरोपीने दिली आहे. पोलिसांच्या तपासात हा जबाब त्याने दिला, पोलिस त्याची अधिक चौकशी करत आहेत.
नेमकं प्रकरण काय ?
दादर स्टेशनमध्ये माथेफिरूच्या एका कृत्यामुळे खळबळ माजली होती. आरोपी दिनेशने सोमवारी दादर स्टेशनवर कॉलेजला जाणाऱ्या एका तरूणीचे केसच कापले आणि बॅगेत भरून पळ काढला. त्या तरूणीने त्याचा पाठलाग करत त्याला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र गर्दीचा फायदा घेत तो पळून गेला. यामुळे मोठी खळबळ माजली होती.
याप्रकरणी तरुणीच्या तक्रारीनंतर मुंबई सेंट्रल लोहमार्ग पोलीस सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपी दिशेनचा शोध घेतला आणि अखेर त्याला अटक केली. धक्कादायक गोष्ट म्हणजे दादर स्टेशनवर घडलेली ही पहिलीच घटना नव्हती तर यापूर्वीही त्याने अशाच एका महिलेचे केस कापले होते.
आरोपी दिनेशने ऑगस्ट 2024 मध्येही त्याने एका 40 वर्षीय महिलेचे केस कापल्याचा प्रकार आता समोर आला आहे. पोलिसांच्या चौकशीत त्याने ही कबुली दिली होती. सध्या तो पोलीस कोठडीत असून पोलीस त्याची अधिक चौकशी करत आहेत. या प्रकरणात आणखी काही आरोपी सामील आहेत का? आणि आतापर्यंत किती महिलांबरोबर असा प्रकार घडला, याचा तपास पोलीस करत आहेत.