कोल्हापुरात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. एका 40 वर्षीय महिलेला तब्बल दोन महिने साखळ दंडाने बांधून ठेवल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , कोल्हापुरातील यादव नगरमध्ये ही घटना असून सारिका हनुमंत साळी असं त्या महिलेचे नाव आहे. कोल्हापूर पोलिसांचे क्राइम ब्रांच आणि राजारामपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन महिलेची सुटका केली.
घटनास्थळी पोहोचल्यावर महिलेची परिस्थिती पाहून पोलिसांच्याही अंगावर काटा आला. महिलेच्या अंगभर साखळदंड बांधलेला होता. इतकंच नाही तर तीन कुलुपाने तिला बांधण्यात आले होते.
पोलिसांनी घराची झाडाझडती घेतल्यावर त्यांना दोन कुलुपांच्या चाव्या सापडल्या. पण तिसरी चावी सापडली नाही, त्यामुळे साखरदंडातून महिलेची सुटका करणे पोलिसांनाही कठीण झालं. त्यानंतर पोलिसांनी चावी बनवणाऱ्या व्यक्तीला बोलवलं आणि तिची अखेर साखरदंडातून सुटका केली.
मिळालेल्या माहितीनुसार महिला तिच्या भाच्याकडे राहत होती. ही घटना इतकी अमानवीय होती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक यांनाही राग अनावर झाला. त्यांनी संबंधित महिलेच्या भाच्याला तिथेच त्याचा कानशिलात लगावली. संबंधित महिला अपंग असून शेजाऱ्यांना त्रास देत असल्यामुळे घरच्यांनी बांधून ठेवल्याची प्राथमिक माहिती मिळाली. पोलिसांनी संबंधित महिलेचा भाचा अनिरुद्ध सूर्यकांत साळी याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी सुरु केली आहे.
दरम्यान, महिलेची प्रकृती बरी नसल्याने तिला उपचारासाठी कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आला. तर पोलिसांनी कुटुंबीयांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात येत आहे.