पाटणा : बिहारचे सिंघम अशी ओळख असलेले मराठमोळे आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांनी पोलीस सेवेतून राजीनामा दिला आहे. शिवदीप लांडे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली.
तिरहुतसारख्या मोठ्या भागातून पूर्णियाला पाठवल्याबद्दल शिवदीप लांडे नाराज असल्याचे म्हटले जात होते. नियुक्तीच्या अवघ्या दोन आठवड्यांनंतर त्यांनी राजीनामा दिला आहे.
सोशल मीडियावर दिली माहिती
गुरुवारी आयपीएस शिवदीप लांडे यांनी सोशल मीडियावर राजीनामा दिल्याची माहिती दिली. यावेळी त्यांनी गणवेशात तिरंग्याला सलाम करतानाचे छायाचित्र शेअर केले आहे.
IPS शिवदीप लांडे यांनी लिहिले आहे की, माझ्या प्रिय बिहार, गेली 18 वर्षे सरकारी पदावर काम केल्यानंतर आज मी पदाचा राजीनामा दिला आहे. एवढ्या वर्षात मी बिहारला माझ्या आणि माझ्या कुटुंबापेक्षा वरचढ मानले आहे. सरकारी कर्मचारी असताना माझ्या काही चुका झाल्या असतील तर मी त्यांची माफी मागतो. आज मी भारतीय पोलीस सेवेचा (आयपीएस) राजीनामा दिला आहे, पण मी बिहारमध्येच राहीन आणि भविष्यातही बिहार माझे कार्यस्थान राहील.
महाराष्ट्रातील असलेले शिवदीप लांडे सिंघम आयपीएस म्हणून लोकप्रिय झाले आहे. आपल्या कामगिरीने त्यांनी बिहारमधील लाखो युवकांच्या मनात घर केले आहे. बिहारच्या प्रत्येक जिल्ह्यात लांडे यांचे प्रचंड चाहते आहेत. ते मुझफ्फरपूरमध्ये जितके लोकप्रिय आहेत तितकेच पटनामध्येही आहे. युथ आयकॉन म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर विविध राजकीय पक्षांनी त्यांच्याशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. आपल्या पक्षात येण्याच्या ऑफर त्यांना मिळू लागल्या आहेत.
शिवदीप वामनराव लांडे २००६ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. शिवदीप लांडे यांचा जन्म २९ ऑगस्ट १९७६ रोजी विदर्भातील अकोला जिल्ह्यात झाला. त्यांचे आई वडील हे सर्वसामान्य शेतकरी वर्गातील आहेत. त्यांनी २ फेब्रुवारी २०१४ रोजी ममता शिवतारे यांच्याशी विवाह केला. त्यांना आरा नावाची मुलगी आहे. ते आपल्या पगारातील ६० ते ७०% रक्कम गरीब मुलींचे सामूहिक विवाह आणि अकोल्यातील विद्यार्थ्यांसाठी कोचिंग क्लासेस आणि वसतिगृह चालवणाऱ्या संस्थेला दान करत असतात.