केंद्र सरकारने राष्ट्रीय गीत 'वंदे मातरम्' बाबत एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. यापुढे सर्व अधिकृत सरकारी कार्यक्रमांमध्ये या गीताची संपूर्ण सहा कडवी गाणे अनिवार्य करण्यात आले आहे. राष्ट्रगीताप्रमाणेच आता वंदे मातरम् सुरू असताना सर्वांना सावधान स्थितीत उभे राहावे लागणार आहे. या संपूर्ण राष्ट्रगीताचा कालावधी 3 मिनिटे 10 सेकंद निश्चित करण्यात आला आहे.
आतापर्यंत ‘वंदे मातरम्’च्या गायना दरम्यान कुठलाही अधिकृत प्रोटोकॉल नव्हता. पण ‘जन गण मन’साठी स्पष्ट नियम होते. सहाकडव्यांचं‘वंदे मातरम्’ अजूनपर्यंत अधिकृत कार्यक्रमात गाण्यात आलेलं नाही. पण आता हे अनिवार्य केलं आहे. भारताचे राष्ट्रगीत 'वंदे मातरम्'च्या रचनेला 150 वर्षे पूर्ण होत असल्याचा आनंद साजरा करण्यासाठी केंद्र सरकारने ऐतिहासिक पाऊल उचलले आहे.
नवीन नियमावलीतील महत्त्वाचे मुद्दे
नवीन प्रोटोकॉलनुसार, राष्ट्रगान "जन गन मन.." च्याआधी राष्ट्रगीत वंदे मातरम्... वाजवले जाईल. वंदे मातरम् सुरू असताना सर्वांना सन्मानाने उभे राहणे बंधनकारक असेल. चित्रपटगृहा यातून वगळण्यात आलं आहे. देशातील सर्व शाळांमध्ये दिवसाच्या कामाची सुरुवात राष्ट्रगीताच्या सामूहिक गायनाने होणे आवश्यक आहे. जर जन-गण-मन आणि वंदे मातरम् एकाच वेळी सादर करायचे असतील, तर प्रथम 'वंदे मातरम्' गायले जाईल.
वंदे मातरम्' कधी वाजवले जाईल?
नागरी सन्मान सोहळे: पदवीदान किंवा इतर सरकारी पुरस्कार सोहळ्यांच्या वेळी.
व्हीव्हीआयपी आगमन: राष्ट्रपती किंवा राज्यपालांच्या आगमन आणि प्रस्थानाच्या वेळी.
राष्ट्रपतींचे संबोधन: आकाशवाणी किंवा दूरदर्शनवरून राष्ट्रपतींचे भाषण सुरू होण्यापूर्वी आणि संपल्यानंतर.
ध्वजारोहण: परेडमध्ये राष्ट्रीय ध्वज नेला जात असताना किंवा सांस्कृतिक कार्यक्रमात ध्वजारोहण करताना.
सामूहिक गायनाचे नियोजन
सार्वजनिक आणि निम-औपचारिक कार्यक्रमांमध्ये जिथे मंत्री उपस्थित असतील, तिथेही हे गीत गायले जाऊ शकते. यासाठी गायक मंडळींची योग्य व्यवस्था करणे. बँड आणि साऊंड सिस्टमची उपलब्धता सुनिश्चित करणे. आवश्यकता असल्यास राष्ट्रगीताच्या लिखित प्रतींचे वाटप करणे असे नियोजन करणे अपेक्षित आहे.