राज्यात ठिकठिकाणी बिबट्यांनी हैदोस घातला आहे. त्यामुळे नागरिक भयभीत झाले असताना अहिल्यानगर शहर व लगतच्या गावात, परिसरात बिबट्या आल्या बनावट चित्रफिती प्रसारित केल्या जात असल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा बनावट चित्रफिती प्रसारित करणाऱ्या लोकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी अहिल्यानगर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सायबर पोलिसांकडे केली आहे.
शहरालगतच्या सारोळा कासार, खडकी, जेऊर, अकोळनेर, भोरवाडी, चिचोंडी पाटील, मांडवे, सांडवे, बुरुडगाव, भिंगार, राळेगण, रुईछत्तीसी आदी गावांसह अहिल्यानगर शहरातील काही भागात बिबट्या दिसल्याच्या चित्रफिती समाज माध्यमावर प्रसारित होत आहेत तसेच गावागावातील समाज माध्यमांच्या गटांवर बिबट्या दिसल्याचे संदेशही प्रसारित होत आहेत. बिबट्याची माहिती समाज माध्यमावर येतात वनविभागाला कळवले जाते, अर्ज प्राप्त होतात.
वन विभागाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी जाऊन खात्री केल्यानंतर बिबट्याच्या वावराच्या कोणत्याही खुणा आढळून येत नाहीत. त्या परिसरातील सीसीटीव्ही मध्येही बिबट्या दिसत नाही. याकडे लक्ष वेधत वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश तेलोरे यांनी सांगितले की, अशा चुकीच्या चित्रफितीमुळे किंवा उत्सुकतेपोटी चित्रफिती प्रसारित केल्या जात असल्यामुळे शहरासह तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अशा चुकीच्या चित्रफिती प्रसारित करणाऱ्या लोकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी सायबर पोलिसांकडे करण्यात आली आहे. शहराजवळील खारेकर्जुने येथे बिबट्याने गेल्या आठवड्यात पाच वर्षांच्या लहान मुलीवर हल्ला करून तिला ठार केले, नंतर निंबळक गावात एका आठ वर्षाच्या मुलावर हल्ला करून त्याला जखमी केले. या घटनांनंतर परिसरातील गावांनी रास्तारोको आंदोलन केले होते.
बिबट्याच्या हल्ल्यामुळे भीतीचे वातावरणही निर्माण झाले होते. त्यानंतर वनविभागाने तेथे पिंजरा लावून एका बिबट्याला जेरबंद केले तर दुसरा बिबट्या विहिरीत पडलेला आढळून आला. त्यालाही वनविभागाने ताब्यात घेतले. मात्र त्यानंतर काही बनावट चित्रफिती प्रसारित केल्या जात असल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश तेलोरे यांनी सायबर पोलिसांकडे दिलेल्या तक्रार जात म्हटले आहे.