जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये महाराष्ट्रातील वृद्ध महिलेसोबत संतापजनक प्रकार घडला. पहलगाममधील आरोपीनं पीडितेवर लैंगिक अत्याचार केला. आरोपी आधी वृद्ध महिलेच्या खोलीत गेला. नंतर तिला ब्लँकेटनं बांधलं आणि तिचं लैंगिक शोषण केलं.
या प्रकरणी पीडित वृद्ध महिलेनं आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. हे प्रकरण न्यायालयात गेलं. न्यायालयाने आरोपीचे जामीन नाकारले असून, पुढील तपास सुरू आहे.
नेमकं घडलं काय?
११ एप्रिल रोजी जम्मू काश्मीर येथील पहलगाममध्ये ७० वर्षीय महिला फिरायला गेली होती. पीडित महिला महाराष्ट्रातील रहिवासी असल्याची माहिती आहे. वृद्ध महिला एका हॉटेलमध्ये थांबली होती. आरोपी झुबैर अहमद महिलेच्या खोलीमध्ये गेला. महिलेला ब्लँकेटनं बांधलं आणि बलात्कार केला. त्यानंतर आरोपी तेथून फरार झाला. आरोपीने केलेल्या हल्ल्यात महिलेला गंभीर दुखापत झाली.
महिलेनं थेट पोलीस ठाणे गाठत आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीनुसार आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. ३० जून रोजी या केस संदर्भात अनंतनाग जिल्हा कोर्टात सुनावणी पार पडली.
या घटनेसंदर्भात आरोपीच्या अर्जावर जेव्हा सुनावणी झाली, तेव्हा त्याने आरोप फेटाळले. परंतु, न्यायालयाने जामीन नाकारला. 'महिलेला अतिशय धक्कादायक वागणूक देण्यात आली. या घटनेतील मानसिकता अत्यंत विकृत आहे', असं न्यायालयाने ठामपणे निदर्शनास आणून दिले.
आरोपीने न्यायालयात दावा केला की, पोलिसांकडून खोट्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच आरोपी म्हणून, वृद्ध महिलेनं मला ओळखले देखील नाही, असा दावा आरोपीने केला.
दरम्यान, 'आतापर्यंत मी पोलिसांना सहकार्य केलं आहे. यापुढेही करेन', असं आरोपी म्हणाला. सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेची माहिती पसरताच परिसरात खळबळ उडाली आहे.