वेव्हज् परिषदेचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन
वेव्हज् परिषदेचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन
img
Dipali Ghadwaje
भारताच्या पहिल्या जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन (वेव्हज्) शिखर परिषदेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर येथे होत आहे. या वेव्हज् परिषदेचे यजमानपद महाराष्ट्र शासन भूषवित आहे.

‘कनेक्टिंग क्रिएटर्स, कनेक्टिंग कंट्रिज’ या घोषवाक्याखाली होणाऱ्या या चार दिवसीय शिखर परिषदेत भारताला मीडिया, मनोरंजन आणि डिजिटल नवप्रवर्तनाचे जागतिक केंद्र म्हणून प्रदर्शित करण्यात येईल.

पंतप्रधान मोदी यांच्या सर्जनशीलता, तंत्रज्ञान आणि प्रतिभेच्या एकत्रीकरणाच्या दृष्टीकोनाशी सुसंगत असलेल्या या वेव्हज् 2025 मध्ये चित्रपट, ओटीटी, गेमिंग, कॉमिक्स, डिजिटल मीडिया, कृत्रिम बुद्धिमत्ता, एव्हीजीसी- एक्सआर ब्रॉडकास्टिंग आणि नव्या तंत्रज्ञानाचा समावेश असेल.

भारताच्या मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रातील सामर्थ्याचे हे सर्वांगीण प्रदर्शन असेल. या उपक्रमाच्या माध्यमातून 2029 पर्यंत 50 अब्ज डॉलर्सच्या बाजारपेठेचे दरवाजे उघडले जातील, असा अंदाज आहे.

या शिखर परिषदेत प्रथमच ग्लोबल मीडिया डायलॉग चे आयोजन मुंबईत होणार आहे. यामध्ये 25 देशांचे मंत्री सहभागी होणार असून, भारताच्या जागतिक मीडिया क्षेत्रातील सहभागात हा एक ऐतिहासिक टप्पा ठरेल.

वेव्हज् बजार या जागतिक ई-मार्केटप्लेसमध्ये 6,100 पेक्षा अधिक खरेदीदार, 5,200 विक्रेते आणि 2,100 प्रकल्प सहभागी होणार आहेत, ज्यातून स्थानिक व जागतिक स्तरावर व्यवसाय आणि नेटवर्किंगच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत.

या परिषदेत प्रधानमंत्री क्रिप्टोस्पियरला भेट देऊन “क्रिएट इन इंडिया” उपक्रमांतर्गत निवड झालेल्या सर्जनशील कलाकारांशी संवाद साधणार आहेत. याशिवाय, ते भारत पॅव्हिलियन, महाराष्ट्र पॅव्हेलियनला देखील भेट देतील. या स्पर्धेसाठी एक लाखांहून अधिक नोंदणी झाली.

वेव्हज् 2025 परिषदेमध्ये 90 हून अधिक देश, 10,000 प्रतिनिधी, 1,000 कलाकार, 300 हून अधिक कंपन्या आणि 350 हून अधिक स्टार्टअप्स सहभागी होणार आहेत.

शिखर संमेलनात 42 मुख्य सत्रे, 39 विशेष सत्रे आणि 32 मास्टरक्लासेस आयोजित करण्यात येणार आहेत, ज्यामध्ये ब्रॉडकास्टिंग, इन्फोटेन्मेंट, एव्हीजीसी- एक्सआर चित्रपट आणि डिजिटल मीडिया यांसारख्या विविध क्षेत्रांचा समावेश असेल.
इतर बातम्या
Join Whatsapp Group