बदलापूरमध्ये एकाहून एक भयानक गुन्ह्यांच्या घटना उघडकीस येत आहेत. बदलापूरमधून एक भयानक प्रकार उघडकीस आला आहे.
कलिंगड विकणारा, साधासुधा दिसणाऱा मनुष्य,याच कलिंगड विक्रीच्या आडून भयानक कृत्य करत होता. चक्क नवजात बाळांच्या विक्रीचा गोरखधंदा करत असल्याचे समोर आले असून बदलापूरमध्ये फॉरेस्ट विभागाने या घृणास्पद कृत्याचा पर्दाफाश केला आहे.
याप्रकरणी मानवी तस्करीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तुषार साळवे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे.
बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशनअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंबरनाथ पश्चिमेच्या फॉरेस्ट नाका परिसरात कलिंगड विकणाऱ्या एका तरुणाला कचरा टाकण्यावरून फॉरेस्ट विभागाच्या कर्मचाऱ्यांनी हटकलं असता त्याने या कर्मचाऱ्याशी हुज्जत घालत त्याचा व्हिडिओ चित्रित केला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला.
या प्रकरणाच्या चौकशीसाठी या तरुणाला वनविभागाच्या कार्यालयात बोलावून त्याने हा व्हिडिओ कुठे कुठे फॉरवर्ड केला आहे, हे पाहण्यासाठी त्याचा मोबाईल तपासला असता त्यात लहान बाळांच्या खरेदी-विक्री संदर्भात केलेली चॅटिंग वनविभागाचे अधिकारी वैभव वाळिंबे यांना आढळून आली.
त्यानुसार त्यांनी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून कलिंगड विक्रेता तरुण तुषार साळवे याच्या विरोधात मानवी तस्करीचा गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
हा एक सराईत आरोपी असून यापूर्वीही अशाच गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी त्याला अटक केली होती अशी ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.
आरोपी तुषार साळवे याला २०२३ मध्ये देखील ठाणे नगर पोलीस ठाण्यात अशाच बाळ विक्रीच्या गुन्ह्यात अटक झाली होती. या प्रकरणात जामीन झाल्यानंतर पुन्हा त्याने तोच धंदा सुरू केला होता. मात्र वनविभागाच्या सतर्कतेमुळे पुन्हा एकदा तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे.
याप्रकरणी बदलापूर पश्चिम पोलिसांनी आरोपीला अटक करत न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला सहा दिवसाची पोलिस कोठडीत सुनावली.
वन अधिकारी वैभव वाळिंबे यांच्या सतर्कतेमुळे बालकांची तस्करी उघडकीस आली असून या प्रकरणाचा तपास सध्या सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल थोरवे यांच्याकडून सुरू आहे.