नवीन नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) : महिला वकिलाच्या घरात प्रवेश करून अज्ञात चोरट्याने सुमारे 23 तोळ्यांचे सोन्याचे दागिने असा एकूण सव्वासात लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना वडाळा-पाथर्डी रोड येथे घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी आदिती संजित बागूल (रा. एकावन लाईफ, फ्लॅट नं. 1203, वडाळा-पाथर्डी रोड, नाशिक) या वकिलीचा व्यवसाय करतात. मे 2025 ते दि. 26 ऑगस्ट 2025 या कालावधीत अज्ञात चोरट्याने बागूल यांच्या उघड्या घरात प्रवेश केला व घरातील बेडरूममध्ये असलेले लाकडी कपाट उघडून त्यातील लॉकरमध्ये ठेवलेला सोन्याचा ऐबक लंपास केला.
यामध्ये 74 हजार रुपये किमतीचा 21.940 ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार, 1 लाख 80 हजार रुपये किमतीच्या 60 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या चार पाटल्या, ८० हजार ५०० रुपये किमतीचे 62.610 ग्रॅम वजनाचे सोन्याचे एक कंगण, 39 हजार रुपये किमतीचा 12 ग्रॅम वजनाचा कानातला जोड, 35 हजार रुपये किमतीचा दहा ग्रॅम वजनाचा सोन्याचा वेढा, 45 हजार रुपये किमतीची 15.310 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन, 18 हजार रुपये किमतीची पाच ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी, 73 हजार 500 रुपये किमतीची 21.260 ग्रॅम वजनाची सोनसाखळी व 80 हजार रुपये किमतीचे 22.520 ग्रॅम वजनाचे सोन्याचे ब्रेसलेट असा एकूण 7 लाख 25 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.
या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार खराटे करीत आहेत.