दिवसा केटरिंगचे काम करून रात्री रस्त्यावरील महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावणार्या सलमान छंगा खान (वय 30) याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि 20 सप्टेंबर रोजी गुन्हे शाखा युनिट 2 चे मनोज परदेशी आणि अतुल पाटील यांना त्यांच्या एका विश्वासू खबर्याकडून पक्की माहिती मिळाली की, आर्यन केटरर्स येथे कामाला असलेला सलमान नावाचा तरुण चोरीची सोनसाखळी विकण्याच्या प्रयत्नात विनयनगर येथे थांबला आहे. ही माहिती मिळताच, पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता सापळा रचत पथकाने शिताफीने सलमानला ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्याने इंदिरानगर पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्याची कबुली दिली.
पोलिसांनी सलमानला न्यायालयात हजर केले असता त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या एका दिवसातच गुन्हे शोध पथकाने आपल्या बुद्धी कौशल्याचा आणि तपासाच्या अनोख्या शैलीचा वापर केला. त्यांनी आरोपीला विश्वासात घेऊन प्रश्नांची सरबत्ती केली असता, त्याने इंदिरानगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या आणखी दोन सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली. त्याच्या अटकेमुळे तीन गुन्हे उघडकीस आले आहेत.
पोलिसांनी त्याच्याकडून 3 लाख 13 हजार 950 रुपये किमतीचे सोने जप्त केले आहे. ही कामगिरी इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे व गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सुनील अंकोलीकर यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकाचे अधिकारी पोउनि संतोष फुंदे आणि त्यांच्या टीममधील अमजद पटेल, पवन परदेशी, सागर परदेशी, योगेश जाधव, दिपक शिंदे, अमोल कोथमिरे, जयलाल राठोड आणि प्रमोद कासुदे यांनी पार पाडली.