नवीन नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- कायदेशीर पासपोर्ट व्हिजा परवाना न घेता बेकायदेशीररीत्या शहरात वास्तव्य करणार्या आठ बांगलादेशी महिलांसह पुरुषांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस हवालदार अमजद पटेल यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की पांडवलेणी परिसरात कवटेकरवाडी येथे काही परदेशी महिला व पुरुष राहत असल्याची माहिती इंदिरानगर पोलीस ठाण्यास मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन छापा टाकला. त्यावेळी तेथे आरोपी शिल्पी मोहम्मद शुकरअली अकथेर ऊर्फ शिल्पी अकथेर (वय 25, रा. हबीगंज, ढाका, बांगलादेश), सौम्या संतोष नायक ऊर्फ सुलताना सब्बीर शेख (वय 28, रा. जोसूर, बांगलादेश), मुनिया खातून टुकू शेख (वय 29, मु. पो. ता. जि. नोडाईल, बांगलादेश), सोन्या कबिरुल मंडल ऊर्फ सानिया रौफिक शेख (वय 27, रा. जोसौर, बांगलादेश), मुक्त जोलिल शेख (वय 32, रा. मु. पो. ता. जि. नोडाईल, बांगलादेश), शामोली बेगम ऊर्फ शामोली शामसू खान (वय 35, रा. जादूपूर, ढाका, बांगलादेश), लकी ऊर्फ लियाकत हमीद कुरेशी (रा. नाशिक) व बॉबी (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) असे आठ संशयित महिला व पुरुष आढळून आले.
हे सर्व जण स्वत:ची ओळख लपवून बांगलादेशी नागरिक असूनसुद्धा कुठल्याही प्रकारची वरिष्ठ कार्यालयाकडून किंवा कार्यालयाकडून परवानगी न घेता कायदेशीररीत्या व्हिजा, पासपोर्ट परवाना न घेता नाशिक शहरात वास्तव्य करताना मिळून आले. लियाकत हमीद कुरेशी व बॉबी यांनी या बांगलादेशी नागरिकांना बेकायदेशीररीत्या वास्तव्य करण्यास मदत केली असल्याचे पोलिसांच्या चौकशीत उघडकीस आले आहे.
या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार अमजद खान यांच्या फिर्यादीनुसार आठ बांगलादेशी महिलांविरुद्ध परदेशी नागरिक कायदा कलमासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनार करीत आहेत.