नवीन नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- उद्योजकाला जिवे ठार मारण्याची धमकी देत खंडणीखोर संतोष शर्माने उद्योजकाकडून 4 लाख रुपयांची खंडणी घेतल्याची घटना अंबड एमआयडीसी परिसरात घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी वैभव उद्धव जोशी (वय 55, रा. रामेश्वरनगर, गंगापूर रोड) यांनी त्यांच्या कंपनीमध्ये काही बांधकाम केले होते. हे बांधकाम अनधिकृत असून, त्याबाबत आरोपी संतोष प्यारेलाल शर्माने जोशी यांच्याविरुद्ध एमआयडीसी कार्यालयात तक्रार देऊन कार्यालयास जोशी यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी नोटीस काढण्यास भाग पाडले.
संतोष शर्माने नितीन थोरात यांच्यामार्फत, तसेच प्रत्यक्ष भेटून जोशी यांना जिवे यांना मारण्याची धमकी देत 25 ऑक्टोबर 2025 रोजी दोन लाख रुपयांची खंडणी घेतली. नंतर नोव्हेंबर 2025 च्या पहिल्या आठवड्यात शर्माने जोशी यांना सांगितले, की तुम्ही मला आताच्या आता आणखी दोन लाख रुपये द्या; नाही तर मी तुमचा गेम करीन, अशी धमकी दिली. घाबरून गेलेल्या जोशी यांनी पुन्हा शर्माला दोन लाख रुपये खंडणीस्वरूपात दिले. या प्रकरणी जोशी यांच्या फिर्यादीवरून संतोष शर्माविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक लाड करीत आहेत.