नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी) :- हॉटेल व्यवसायामध्ये चांगला नफा मिळवून देतो, असे आश्वासन देऊन एका तरुणासह त्याच्या कुटुंबीयांची 50 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आरोपी इसमासह त्याची पत्नी व आई यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी निखिल कैलास गुजराथी (रा. हिरण्यमय सोसायटी, शिखरेवाडी, नाशिकरोड) यांचे वडील वकील असून, ते खासगी व्यवसाय करतात. त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की एप्रिल 2021 मध्ये फिर्यादी गुजराथी याचीं पीएनआरसी गोविंदनगर येथे आरोपी वेदांशू रवींद्र पाटील (मूळ रा. अमळनेर, जि. जळगाव, ह. मु. उंटवाडी, नाशिक) याच्यासोबत ओळख झाली होती. तेव्हा गुजराथी व पाटील यांच्यामध्ये हॉटेल व्यवसायाबाबत बोलणे झाले. तेव्हा वेदांशू याने हॉटेल व्यवसायात चांगला नफा मिळतो, असे सांगितले होते.
तेव्हा वेदांशूने गुजराथी यांना हॉटेल व्यवसाय करण्याबाबत प्रस्ताव दिला होता. व्यवसाय करण्याची इच्छा असल्याने फिर्यादीने तेव्हा या प्रस्तावाला होकार दिला. त्यानंतर दोघांच्याही भेटीगाठी होत होत्या. एक दिवस आरोपी वेदांशू हा फिर्यादीच्या घरी आला व म्हणाला, की अविनाश ठाकरे यांची महिरावणी येथे जमीन असून, ही जमीन आपण कराराने घेऊन त्यावर हॉटेल व्यवसाय सुरू करू, असा प्रस्ताव दिला. त्यानंतर हॉटेल व्यवसायासंदर्भात आरोपी व फिर्यादी यांच्यात बर्याच मीटिंग झाल्या.
त्यानंतर वेदांशू याने फिर्यादी व त्याच्या घरच्यांकडून कन्सलटन्सी फी म्हणून दहा लाख रुपये इतकी रक्कम मागितली होती व त्यात पूर्ण हॉटेल प्रोजेक्ट खात्रीशीर नफा करून चालवून देण्याची, तसेच हॉटेल व्यवसाय यशस्वीरीत्या करून देण्याबाबत गुजराती यांच्यासह त्यांच्या घरच्यांना आश्वासन दिले होते. त्यामुळे आरोपी वेदांशू याच्या सांगण्यावर फिर्यादीने विश्वास ठेवून सदर ठिकाणी दि. 7 सप्टेंबर 2023 रोजी हॉटेल अर्बन एअर फूड कोर्ट या नावाने हॉटेलचे उद्घाटन केले होते. त्यावेळी आरोपी वेदांशू याच्या सांगण्यावरून कंत्राटदार विनोद साळुंखे व वास्तुविशारद म्हणून राजीव पाटील याांना नेमण्यात आले व त्यासाठी त्यांना मोठ्या रकमा दिल्या होत्या.
त्यानंतर साधारणपणे एक ते दीड महिना हा हॉटेल व्यवसाय पूर्णत: नुकसान होऊन बंद पडला. त्याबाबत फिर्यादी गुजराथी यांनी आरोपी वेदांशू पाटीलला एवढा खर्च करूनदेखील नुकसान झाल्याबाबत विचारणा केली. तेव्हा आरोपी पाटील याने सांगितले, की बंद पडलेला हॉटेल व्यवसाय अर्बन एअर हॉटेल परत सुरू करून नुकसानभरपाई करायची असल्यास मी दुसरा उपाय सांगतो, असे म्हणून आपल्या बंद पडलेल्या हॉटेलमागे गोपाल दामू दाते यांच्याशी माझी ओळख असून, त्यांची मोठी जमीन आहे. आपण तेथे ओपन थिएटर (अर्बन एअर) टाकू व व्यवसाय सुरू करून या नवीन प्रोजेक्टमधून नफा करून देतो व बंद पडलेले हॉटेलदेखील परत चांगले चालवून देतो, असे खोटे आश्वासन फिर्यादी गुजराथी यांच्यासह त्यांच्या घरच्यांना दिले.
त्यासाठी 75 लाख रुपये इतकी रक्कम फिर्यादीसह त्याच्या घरच्यांना भेटून मागितली, तसेच या प्रोजेक्टमध्ये भरपूर उत्पन्न मिळेल, असे वेळोवेळी प्रलोभन दाखवून गुजराथी यांच्याकडून एचडीएफसी बँक, नाशिकरोड शाखेतील चेकद्वारे दि. 27 डिसेंबर 2022 रोजी एक लाख रुपये, 9 जानेवारी 2023 रोजी दहा लाख रुपये, दि. 11 जानेवारी 2023 रोजी 14 लाख रुपये व 23 फेब्रुवारी 2023 रोजी 25 लाख रुपये याप्रमाणे 50 लाख रुपये किमतीच्या धनादेशाद्वारे फिर्यादीच्या शिखरेवाडी येथील घरी येऊन आरोपी वेदांशू पाटील, त्याची आई तिलोत्तमा पाटील व पत्नी करिश्मा पाटील (सर्व रा. अमळनेर, जि. जळगाव, ह. मु. विहार संकुल, उंटवाडी, नाशिक) यांनी आमिष दाखवून स्वत:च्या खात्यावर वटवून घेत ही रक्कम स्वीकारली.
त्यानंतर वेदांशू याला अर्बन एअर ओपन ड्राईव्ह इन थिएटरबाबतची कागदपत्रे तयार करण्यासाठी वेळोवेळी विनंती केली; मात्र आरोपी वेदांशू पाटील याने फिर्यादी गुजराथी यांना उडवाउडवीची उत्तरे देऊन त्यांनी वेळकाढूपणा केला. त्यामुळे वेदांशू पाटील याने केवळ पैसे उकळण्याच्या उद्देशाने व फिर्यादीचे करिअर करून त्यात नफा मिळवून देण्याचे खोटे आमिष दाखवून 50 लाख रुपयांची फसवणूक केल्याची बाब लक्षात आली.
या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुजराथी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार वेदांशू पाटील, तिलोत्तमा पाटील व करिश्मा पाटील यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पावरा करीत आहेत.