नाशिक : खासगी सावकाराने उकळली १७ लाखांची खंडणी
नाशिक : खासगी सावकाराने उकळली १७ लाखांची खंडणी
img
Prashant Nirantar
नवीन नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- व्याजाने घेतलेले पैसे व्याजासह मुदतीत परत करूनदेखील एका खासगी सावकाराने 17 लाखांची खंडणी उकळल्याची घटना त्रिमूर्ती चौकात घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की फिर्यादी किशोर माधवराव देवरे (वय 34, रा. फडोळ मळा, अंबड शिवार) यांना इलेक्ट्रिकचा व्यवसाय करायचा होता. त्यामुळे त्यांनी सन 2022 व 2023 मध्ये खासगी सावकार विजय बाळासाहेब झनकर ऊर्फ भावड्या (रा. तोरणानगर, सिडको) यांच्याकडून दरमहा दहा टक्के व्याजाप्रमाणे 7 लाख 68 हजार 500 रुपयांचे कर्ज घेतले होते. ही कर्जाची रक्कम देवरे यांनी फेडल्यानंतरही झनकरने व्याजासह आतापर्यंत 16 लाख 76 हजार रुपये घेतले आहेत.

व्यावसायिक नितीन गिलबिले हत्या प्रकरणात फरार माजी नगरसेवकावर ‘मकोका’

व्याजाची रक्कम वेळेवर दिली नाही, असे कारण सांगत त्याने देवरे यांची 8 लाख 50 हजार रुपये किमतीची एमएच 15 जीव्ही 9596 या क्रमांकाची स्विफ्ट डिझायर कार, 3 लाख 50 हजार रुपये किमतीची एमएच 15 एचव्ही 0133 या क्रमांकाची बुलेट, 2 लाख 80 हजार रुपये किमतीची एमएच 15 एचबी 8494 या क्रमांकाची यामाहा आर 15, 1 लाख 10 हजार रुपये किमतीची एमएच 15 एचके 4378 या क्रमांकाची होंडा अ‍ॅक्टिव्हा, 2 लाख 50 हजार रुपये किमतीची एमएच 04 ईक्यू 0684 या क्रमांकाची ह्युंडाई आय-20 कार अशा एकूण 18 लाख 40 हजार रुपये किमतीच्या पाच गाड्या झनकर जबरदस्तीने घेऊन गेला.

या गाड्या परत पाहिजे असतील, तर 15 लाख रुपये घेऊन ये, असे तो वारंवार सांगत होता. आरोपी विजय झनकरने व्याजाच्या रकमेची वसुली करण्यासाठी अनेकदा गुंडांसहित घरात अनधिकृतपणे प्रवेश करीत पत्नी व भाच्यासमोर देवरे यांना अर्वाच्य शिवीगाळ करीत मारहाण केली. झनकरने देवरे यांच्या पत्नीला उचलून घेऊन जाण्याची धमकी देत कुटुंबीयांना जिवे मारण्याची धमकी देऊन जबरदस्तीने 16 लाख 76 हजार रुपये खंडणीच्या स्वरूपात घेतल्याचे देवरे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

एक दिवस झनकरने फिर्यादी देवरे यांना कारमध्ये जबरदस्तीने बसवून एटीएम सेंटरवर जात पैसे काढण्यास सांगितले. देवरे यांनी पैसे काढण्यास नकार दिल्याने झनकरने त्यांना गाडीतून ढकलून दिले. या प्रकरणी देवरे यांच्या फिर्यादीवरून झनकर व त्याच्या गुंड साथीदारांविरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पडोळकर करीत आहेत.
Nashik |
इतर बातम्या
Join Whatsapp Group