महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे, अनेक ठिकाणी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युती आणि आघाड्याचं राजकारण रंगलं आहे. राज्यातील सर्व २९ महापालिकांमध्ये १५ जानेवारी रोजी मतदान, तर १६ जानेवारीला निकाल जाहीर होणार आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी केली जात असून आता नाशिकमधून एक मोठी बातमी समोर येत आहे.
नाशिकमध्ये महाविकास आघाडीवर अखेर शिक्कामोर्तब झाले असल्याची माहिती समोर आली आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना, शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे आणि काँग्रेस असे सर्व पक्ष एकत्रित निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. मत विभाजन टाळण्यासाठी महाविकास आघाडीचे सगळे घटक पक्ष एकत्रित आल्याची माहिती महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माजी आमदार सुनील भुसारा पत्रकार परिषदेत म्हणाले की, बैठकीच्या दोन, तीन फेऱ्या झाल्यात. 10 ते 12 जागांचा तिढा कायम आहे. आज संध्याकाळपर्यंत याबाबत निर्णय होईल. मनसे, काँग्रेस, शिवसेना, आम्ही सगळे एकत्रित निवडणूक लढणार आहोत. ठाकरेंची शिवसेना सर्वाधिक जागा लढणार आहे. मोठा भाऊ शिवसेना असणार आहे. त्यांच्या कोट्यातून मनसेला जागा दिल्या जाणार आहेत.