नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- कंपनीमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून, तसेच तीन महिलांना स्वस्तात फ्लॅट देतो, असे सांगून साडेपंधरा लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की आरोपी ओमकार सुरेश डावरे याने फिर्यादी महिला (वय 42, रा. वडनेर दुमाला, नाशिक) यांच्यासोबत फेब्रुवारी 2024 मध्ये ओळख केली. तो आयटी कंपनीत कामाला असल्याचे त्याने फिर्यादी महिलेला सांगितले होते. “तुमच्या मुलीला नोकरी लावून देतो,” असे सांगून त्याने फिर्यादी महिलेचा विश्वास संपादन करीत त्यांच्याकडून 6 लाख 59 हजार रुपये घेतले.
पैसे घेऊनही त्याने नोकरी न दिल्याने व पैसे देण्यास टाळाटाळ केल्याने आपली फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले. त्याचदरम्यान त्याने फिर्यादी महिलेच्या दोन बहिणी व आईला सोने स्किममधून फ्लॅट स्वस्तात घेऊन देतो, असे आमिष दाखविले.
फ्लॅट घेण्यासाठी त्याने तिघींकडून 18 तोळे सोने घेत दत्तमंदिर रोडवरील लुणावत फायनान्स व फेडरल बँक येथे ते सोने गहाण ठेवून त्याच्या नावावर 9 लाख रुपये घेतले आणि कोणताच फ्लॅट घेऊन दिला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्या महिलांनी ओमकार डावरेविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सपकाळे करीत आहेत.