नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी) : नांदूर नाका परिसरात पायावरून गाडी गेल्याच्या किरकोळ वादातून झालेल्या हाणामारीत गंभीर जखमी झालेल्या राहुल संजय धोत्रे या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नांदूर नाका येथे २२ ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. सनी धोत्रे याचा निमसे कुटुंबातील युवकांसोबत किरकोळ वाद झाला. त्यावरून संशयित आरोपीने शिवीगाळ व दमदाटी करून गर्दी जमवल्याचे फिर्यादीने सांगितले. त्यानंतर आरोपी व त्याच्या साथीदारांनी लाकडी, लोखंडी दांडे व चाकूसारख्या हत्यारांनी फिर्यादीच्या नातेवाईकांवर हल्ला केला.
या हल्ल्यात अजय दत्तू कुसाळकर व राहुल संजय धोत्रे यांना तीष्ण हत्याराने जबर मारहाण केली होती. दोघांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, आठ दिवसांच्या उपचारानंतर राहुलचा मृत्यू झाला असल्याची माहिती आडगाव पोलिसांनी दिली. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण असून पुढील तपास आडगाव पोलिस करीत आहे.