सांगलीतुन एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. सांगलीच्या कृष्णा नदीपात्रात बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंत्याचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही हत्या आहे की आत्महत्या हे अद्याप अस्पष्ट आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नदीपात्रात अवधूत अशोक वडार असं या सरकारी अधिकाऱ्याचा मृतदेह सापडला आहे. कनिष्ठ अभियंता अवधूत वडार हे जतच्या बांधकाम उपविभागात कार्यरत होते. सांगलीच्या कृष्णा नदीत आज, शनिवारी त्यांचा मृतदेह आढळून आला. प्राथमिकदृष्ट्या ही आत्महत्या असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असला तरी, नातेवाइकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे.
वडार यांना आमदाराचा स्वीय सहायक आणि जिल्हा परिषदच्या माजी सदस्याचा पती आणि पंचायत समिती कर्मचाऱ्यांकडून वारंवार त्रास दिला जात होता, असा खळबळजनक आरोप त्यांच्या नातेवाइकांनी केला आहे. जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा आक्रमक पवित्रा नातेवाइकांनी घेतला आहे