उत्तरप्रदेशात कानपूरमध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. शनिवारी दुपारी एका महिला स्टेनोने कोर्ट कॉम्प्लेक्सच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारली. सहाव्या मजल्यावरून उडी मारल्यामुळे तरूणीचा जागीच मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना कोतवाली परिसरातील कोर्ट कॉम्प्लेक्समध्ये घडली. तरूणीनं आत्महत्या केल्यानंतर न्यायालयात एकच खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला, तसेच तपासाला सुरूवात केली. तरूणीनं आत्महत्या का केली? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. पोलिसांकडून सीसीटीव्ही देखील तपासले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून पुरावे गोळा केले आहेत. नेहा शंखवार (वय वर्ष ३०) असे मृत तरूणीचे नाव असून, ती सिव्हिल कोर्ट सीनिअर डिव्हिजन चीफ जस्टिसच्या कोर्टात स्टेनो होती. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून, शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवला आहे.
दुसरीकडे मृताच्या आजोबांनी कोर्टात तैनात कर्माचाऱ्यांवर तिचा छळ केल्याचा गंभीर आरोप केला आहे. तणावाखाली येऊन तिनं आयुष्य संपवलं असल्याचं त्यांनी सांगितलं. याबाबत आता पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.