खेळविश्वातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशाचं नाव जगभरात पोहचवणारी खेळाडू रोहिणी कलम हिने टोकाचं पाऊल उचललं. राधागंजमध्ये बहिणीच्या खोलीमध्ये तिने गळफास घेत आत्महत्या केली. रोहिणीच्या आत्महत्येनं क्रीडा विश्वावर शोककळा पसरली. ३४ वर्षांच्या रोहिणीने टोकाचा निर्णय का घेतला? याबाबतचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

आशियाई खेळात रोहिणी कलम ही भारताचे जु जित्सु खेळात प्रतिनिधित्व करत होती. रविवारी तिने देवास शहरातील अर्जुन नगरमध्ये राधागंज येथे आत्महत्या केली. बहीण रोशनीने तिचा मृतदेह पाहिला. तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले, पण डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले. रोहिणीने आत्महत्या केली, त्यावेळी आई आणि बहीण देवदर्शनासाठी गेल्या होत्या. तर वडील कामानिमित्त घराबाहेर गेले होते. त्यावेळी रोहिणीने आत्महत्या केली.
रोहिणी सध्या आष्टा येथे एका खासगी शाळेत मार्शल आर्ट कोच म्हणून काम करत होती. त्या ठिकाणाच्या कामामुळे ती टेन्शनमध्ये असल्याचे बहीण रोशनीने सांगितले. शनिवारी रोहिणी देवासमधील घरी आली होती. रविवारी सकाळी आमचं व्यवस्थित बोलणेही झाले होतं. पण फोनवर बोलत ती घरात गेली अन् दरवाजा लावून घेतला असे रोशनीने सांगितले.
जु जित्सु खेळाडू आणि कोच रोहिणीचे वडील बँक नोट प्रेसमधील निवृत्त कर्मचारी आहेत. रोहिणी चार बहिणींमध्ये सर्वात मोठी आहे. रोहिणीने हांगझोऊ येथे झालेल्या १९ व्या आशियाई खेळात भारताचे प्रतिनिधित्व केले होते. बर्मिंघममध्येही झालेल्या जागितक स्पर्धेसाठी पात्र ठरणारी एकमेव भारतीय खेळाडू होती. याशिवाय भारतातही तिने अनेक पदकांवर नाव कोरलेय. २००७ मध्ये तिने आपल्या खेळाच्या करिअरला सुरूवात केली होती.
दरम्यान, रोहिणीने आत्महत्या केली, त्या ठिकाणाहून कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. याबाबत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास करण्यात येत आहे.