सोलापूर शहरातुन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध उद्योजक मुलतानी बेकरीचे मालक आणि उद्योजक सुनील सदारंगानी (वय 55) यांनी गुरुवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास विजापूर रोडवरील सर्वात उंच पनाश अपार्टमेंटवरुन उडी घेत आत्महत्या केली आहे. सोसायटीमधील एका व्यक्तीने त्यांना समजावून खाली आणले मात्र त्यांच्या हाताला झटका देत पुन्हा ते वर गेले आणि उडी मारल्याचे प्राथमिक माहिती समोर आली आहे.आत्महत्या करण्यापूर्वी ते सतराव्या मजल्यावर चढून हात जोडत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
सुनील सदारंगानी यांच्या आत्महत्येपूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. यामध्ये आत्महत्येपूर्वी सदारंगानी काही काळ 17व्या मजल्यावर थांबले होते. त्यांनी हात जोडून प्रार्थना केली, काही वेळ स्तब्ध उभे राहिले आणि नंतर खाली झोपून इमारतीवरून खाली कलांडले. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. मोठा आवाज ऐकून अपार्टमेंटमधील नागरिक घटनास्थळी जमा झाले.दरम्यान, घटनेची माहिती मिळताच विजापूर नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा गायकवाड, पोलीस निरीक्षक सुशांत वराळे व विलास घुगे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
कोण आहेत सुनील सदारंगानी?
सुनील सदारंगानी हे सोलापुरातील प्रसिद्ध मुलतानी बेकरीचे मालक होते. तसेच ते राजकुमार राठी यांचे जावई होते. काही वर्षांपूर्वी मुलतानी बेकरी बंद पडली होती. त्यानंतर ते पुण्यात वास्तव्यास गेले होते. पुण्याच्या खराडी भागात ते राहात होते. गेल्या काही वर्षांपासून सदारंगानी हे आर्थिक अडचणींचा सामना करत होते. तसेच त्यांच्यावर मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार देखील सुरू असल्याची माहिती नातेवाईक आणि मित्रांनी पोलिसांना दिली.
सुनील सदारंगानी हे 4-5 दिवसांपूर्वीच पत्नीसह सोलापुरात आले होते. आता ते सोलापुरात स्थायिक होण्याच्या विचारात होते. त्यांना दोन मुले असून एक मुलगा अमेरिकेत तर दुसरा पुण्यात व्यवसाय करतो. अमेरिकेत असणारा मुलगा सोलापूरला येत आहे. त्यामुळे आज, शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.