टीव्ही आणि सोन्याच्या अंगठीसाठी नवविवाहितेचा छळ ,  चार महिन्याच्या संसाराचा भयंकर शेवट
टीव्ही आणि सोन्याच्या अंगठीसाठी नवविवाहितेचा छळ , चार महिन्याच्या संसाराचा भयंकर शेवट
img
वैष्णवी सांगळे
गेल्या काही दिवसांपासून हुंडाबळीच्या प्रकारात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं पहायला मिळतंय. मागील काही महिन्यांपासून पुण्यातून याचे अनेक प्रकरणं समोर आली होती. अशातच आता सोलापुरातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. सोलापुरच्या मोहोळ तालुक्यात हुंड्यासाठी एका विवाहितेची गळा दाबून हत्या करण्यात आली आहे. सारोळे गावात घडलेल्या या दुर्दैवी घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. लग्नाला अवघे 4 महिने झाले नसतानाच सासरच्या मंडळींनी पैशाच्या हव्यासापोटी छळ केला अन् तिची गळा दाबून हत्या केली आहे.

हत्या झालेल्या विवाहित महिलेचे नाव सोनाली प्रतीक शिंदे (२२ वर्ष) असे आहे. अवघ्या ४ महिन्यांपूर्वी मोठ्या आशेने सोनालीचा विवाह प्रतिकशी लावून देण्यात आला होता. लग्नानंतर काही दिवसांतच सासरच्या मंडळींनी आपला खरा चेहरा दाखवण्यास सुरुवात केली होती. “लग्नात टीव्ही दिला नाही, आमचा मानपान करून सोन्याची अंगठी पण आमच्या मुलाला घातली नाही,” असे टोमणे मारण्यात येत होते. आरोपी प्रतीकने तर सोनालीच्या वडिलांना धमकी दिली होती की, जर मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर तो तिला माहेरी आणून सोडून देईल. त्यानंतर सोनालीच्या गरीब आई-वडिलांनी परिस्थिती नसतानाही 20 हजार रुपये देऊन समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. तरी देखील सोनालीचा छळ सुरूच होता.

12 एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास प्रतिकने सोनालीच्या वडिलांना फोन केला आणि सांगितले, सोनाली पहाटे उठली नाही म्हणून आम्ही तिला हॉस्पिटलला नेत आहोत. मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केलं. सुरुवातीला हा नैसर्गिक मृत्यू असल्याचा बनाव सासरच्यांकडून रचण्यात आला होता. मात्र सोनालीचे वडील दत्तात्रय सुरवसे यांना संशय आला.

सोनालीच्या वडिलांनी याबाबत पोलिसांना कळवले. पोलिसांनी तात्काळ घटनेचा गांभीर्य लक्षात घेऊन तपासाला सुरुवात केली. मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला. सोनालीचा पोस्टमार्टम अहवाल समोर आल्यानंतर डॉक्टरांनी तिची गळा दाबून हत्या केल्याचं स्पष्ट केलं. सोनालीच्या वडिलांनी याप्रकरणी फिर्याद दिली. पोलिसांनी पती प्रतीक शिंदे आणि सासू भामाबाई उर्फ वंदना आनंद शिंदे यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या दोघांना ताब्यात घेतले आहे. या घटनेने खळबळ उडाली असून तपास सुरु आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group