सोलापूर लोकसभेसाठी भारतीय जनता पक्षाकडून माळशिरस तालुक्याचे आमदार राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर दुसरीकडे काँग्रेसच्या नेत्या प्रणिती शिंदे यांना महाविकास आघाडीने याआधीच सोलापूरची उमेदवारी दिली असून त्यांनी प्रचाराला सुरुवातही केली आहे. दरम्यान, सोलापुरात सातपुते विरुद्ध शिंदे असा सामना पाहायला मिळणार आहे.
दरम्यान सातपुते यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी पत्र लिहित उमेदवार इथला असो किंवा बाहेरचा असा टोला लगावत राम सातपुते यांचे स्वागत केले होते. त्यांच्या या टीकेला आता राम सातपुते यांनी जोरदार प्रत्यूत्तर दिले आहे.
काय म्हणालेत राम सातपुते?
आ. प्रणिती शिंदेजी, जय श्रीराम...! मी २०१९ पासून सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतोय. मी आमदार झाल्यापासून ते आजतोवर मी माझ्या मतदारसंघातील जनतेच्या, आणि त्यायोगे सोलापूर जिल्ह्यातील जनतेच्या सेवेत माझ्या परीने प्रामाणिकपणे होईल तेवढी विकासकामे करण्याचा प्रयत्न केलाय.
मी ज्या भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे, तिथे आम्ही समाजाला एकसंध ठेवण्यासाठी मा. नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात "सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास" या मंत्राला सार्थ ठरवत समाजातील शेवटच्या घटकाच्या कल्याणासाठी झटत आहोत. समाजात धर्म, जातीपातीत फूट पाडून कुणी एवढं वर्ष राजकारण केलंय, हे सोलापूरच्याच नव्हे तर पूर्ण देशाच्या जनतेनं आता चांगलंच ओळखले आहे, असा टोला राम सातपुते यांनी लगावला.
तसेच राजकारणाची कुठलीही पार्श्वभूमी नसलेल्या एका ऊसतोड कामगाराच्या कुटूंबात जन्मलेल्या माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर भारतीय जनता पार्टीने जो विश्वास दाखवलाय, त्याला सोलापूरचा सर्वांगिण विकास करून सार्थ ठरवण्यासाठी मी नक्कीच प्रयत्नशील राहीन, असेही राम सातपुते यांनी या पत्रामध्ये म्हटले आहे.
प्रणिती शिंदेंच्या पत्रात नेमके काय?
सातपुते हे आयात केलेले उमेदवार आहेत, असे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न शिंदे यांनी केला. आपलं सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात स्वागत आहे. सोलापूर हे कायमच बहुभाषिक, बहुधार्मिक, सर्वधर्मसमभाव मानणारं शहर आहे. इथे सर्वांना आपली मतं मांडण्याची मुभा मिळते, मग तो इथला असो किंवा बाहेरचा. मी सोलापूरची लेक म्हणून तुमचं स्वागत करते, असं प्रणिती शिंदे आपल्या पत्रात म्हणाल्या आहेत.
दरम्यान ही निवडणूक लोकशाहीच्या मार्गाने लढवुया आणि सशक्त लोकशाहीची चुणूक दाखवूया असे म्हणत प्रणिती शिंदे यांनी राम सातपुते यांना आव्हान दिले आहे. प्रणिती शिंदे यांच्या या ट्विटमुळे सोलापुरात राजकीय धुळवड सुरू झाल्याचे चित्र दिसून आले आहे.