महाराष्ट्राच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. भाजपचे नेते आणि राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांची सोमवारी रात्री अचानक भंडारा जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून उलचबांगडी करण्यात आली आहे. याबाबतचा शासन आदेश जारी करण्यात आला आहे. संजय सावकारे यांच्या जागी आता पंकज भोयर यांच्याकडे भंडाऱ्याचे पालकत्व देण्यात आले आहे. संजय सावकारे यांच्यावर आता बुलढाणा जिल्ह्याचे सहपालकमंत्री म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
हे ही वाचा
मागील काही दिवसांपासून सावकारे भंडाऱ्याचे पालकमंत्री होते, पण झेंडामंत्री म्हणून त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता. फक्त १५ ऑगस्ट अथवा २६ जानेवारी या काळातच सावकारे भंडाऱ्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत होता. भंडारा जिल्ह्यातील कोणत्याही समस्या, आढावा बैठकीसाठी फक्त हजेरी लावली जायची. भंडारा अथवा परिसरातील पालकमंत्री हवा, अशी नागरिकांची मागणी होती.
हे ही वाचा
त्यामुळेच सावकारे यांची उलचबांगडी केली असावी असा अंदाज बांधला जातोय. पंकज भोयर हे भंडाऱ्याच्या जवळच्या वर्धा जिल्ह्यातील आहेत. त्यांना भंडारा जिल्ह्याची जाण मोठ्या प्रमाणात असू शकते. आगामी नगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, त्यावर पकड मजबूत करण्यासाठी भोयर यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे का? अशी चर्चा आहे.