कल्याण – उल्हासनगर येथील हिल लाईन पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्येच भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना नेते महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला.
या प्रकरणी पोलिसांनी आमदार गणपत गायकवाड यांच्यासह तिघांना अटक केली आहे. जमिनीचा वाद आणि आपसांतील वैमनस्य यातून हा प्रकार घडल्याचे समजते. महेश गायकवाड यांच्यावर ठाण्यातल्या ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. खा. श्रीकांत शिंदे यांनी महेश गायकवाड यांनी रुग्णालयात जाऊन भेट घेतली.
उल्हासनगर मधील हिल पोलीस ठाण्यात काल रात्री भाजपचे कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेनेचे शिंदे गटाचे कल्याण पूर्व विभागाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यात बोलाचाली झाली. यावेळी आ. गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड आणि त्यांच्या समर्थकांवर गोळीबार केला.
या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. महेश गायकवाड यांना पाच गोळ्या आणि त्यांच्या एका समर्थकाला गोळ्या लागल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीने माध्यमांना दिली.