संसदेची सुरक्षा भेदली, २ अज्ञातांनी अचानक सभागृहात मारल्या उड्या, खासदारांची पळापळ
संसदेची सुरक्षा भेदली, २ अज्ञातांनी अचानक सभागृहात मारल्या उड्या, खासदारांची पळापळ
img
Dipali Ghadwaje
संसदेचं हिवाळी सत्र चालू आहे, यादरम्यान संसदेच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याचं समोर आलंय. संसदेच्या लोकसभेचं कामकाज चालू असताना दोन अज्ञातांनी प्रेक्षक गॅलरीतून उड्या मारल्या. यासर्व गोंधळामुळे सभागृहात खासदारांची पळापळ झाली.

दरम्यान या दोघांना सुरक्षा कर्मचाऱ्यांनी पकडलं आहे. सभागृहात उड्या मारणारे तरुण हे कर्नाटकाच्या म्हैसूर येथील खासदाराच्या शिफारशीने संसदेत आले होते. म्हैसूरचे खासदार प्रताप सिम्हा आहेत.

काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी या घटनेविषयी माहिती देताना सांगितले की, दोन जणांनी सभागृहात उड्या मारल्या. उड्या मारल्यानंतर त्यांनी काहीतरी फेकलं यामुळे गॅस निघू लागला. दरम्यान खासदारांनी या दोघांना पकडलं आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या ताब्यात दिलं. सभागृहाचं कामकाज दुपारी दोन वाजता तहकूब करण्यात आलं आहे.

आज सकाळी संसदेबाहेर काही लोकांनी गोंधळ घातला. संसदेच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या दिल्ली पोलिसांनी या दोन्ही आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. आंदोलकांमध्ये एक महिला आणि एक पुरुष आहे. या दोघांना ताब्यात घेऊन पोलीस चौकशी करत आहेत. नीलम कौर सिंह असे ताब्यात घेण्यात आलेल्या महिलेचे नाव असून तिचे वय ४२ वर्ष आहे. तर ताब्यात असलेला दुसरा मुलाचं नाव अमोल शिंदे आहे. अमोल हा लातूर येथील असून त्याचे वय २५ आहे.
 
दरम्यान आता या घटनेवर राजकीय नेते प्रतिक्रिया देत आहेत. भाजपचे खासदार सत्यपाल सिंह म्हणाले की, लोकसभेच्या शुन्य तासाचे कामकाज चालू असताना दोन जणांनी प्रेक्षक गॅलरीतून उड्या मारल्या. खाली उड्या मारल्यानंतर या दोघांनी आणलेल्या वस्तूमधून पिवळ्या रंगाची गॅस निघू लागला. हे सुरक्षेच्या अभावामुळे झालं आहे. लोकसभेच्या सुरक्षेचा भंग झालाय. दरम्यान या दोघांना सुरक्षा कर्मचाऱ्यांनी पकडलं आहे.

तर काँग्रेस खासदार कार्तिक चिंदबरम म्हणाले की, दरम्यान २० वर्षानंतर दोन तरुण प्रेक्षक गॅलरीतून खासदारांच्या बाकांवर उड्या मारल्या. त्यांच्या हातात एक डब्बा होता. त्यातून पिवळा धूर निघत होता. या दोघांपैकी जण थेट अध्यक्षांच्या खुर्चीकडे धावून जात होता. त्यांनी घोषणाबाजी केली. डब्यातून बाहेर निघणारा धूर हा विषारी असू शकत होता. संसदेवरील हल्ल्या होण्याच्या घटनेला आज २२ वर्ष होत आहेत, त्याचवेळी अशी घटना घडणं हे सुरक्षेचा भंग आहे.

तर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या घटनेची चौकशी केली जात असल्याचं सांगितलं. "शून्य तासात घडलेल्या घटनेची सखोल चौकशी केली जात आहे. दिल्ली पोलिसांना आवश्यक सूचनाही देण्यात आल्या आहेत. प्राथमिक तपासात असे आढळून आले आहे की, हा केवळ धूर होता यामुळे धुराची चिंता करू नका, असं लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सांगितले.

दरम्यान  या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. तसेच या घटनेची पुढील चौकशी केली जात आहे. 

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group