भाजपला मोठा धक्का! शरद पवारांच्या राष्ट्रवादीत 'वसंत' फुलणार
भाजपला मोठा धक्का! शरद पवारांच्या राष्ट्रवादीत 'वसंत' फुलणार
img
Dipali Ghadwaje
पंढरपूर : भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे खंदे समर्थक व पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष वसंत देशमुख यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. मतदारसंघातील आपल्या समर्थकांच्या घेतलेल्या बैठकीत हा निर्णय झाला. त्यामुळे सोलापूरच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. 

गेल्या सहा महिन्यांपासून कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार शरद पवार यांच्यासोबत जाण्याचा विचार सुरु होता. मात्र, आता कार्यकर्ते ऐकायला तयार नसल्याने शरद पवार यांची भेट घेऊन लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे वसंत देशमुख यांनी सांगितले आहे. 

वसंत देशमुख हे सुरुवातीपासून दिवंगत माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जात होते. परिचारक यांच्या पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे ते उपाध्यक्ष असून जिल्हा परिषद सदस्य आहेत. पंढरपूर तालुक्यावर देशमुख यांचे चांगले वजन असून त्यांचा राष्ट्रवादी प्रवेश ही भाजपासाठी मोठी डोकेदुखी ठरणार आहे. 

पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून उमेदवारीची मागणी करण्याचा आग्रह कार्यकर्त्यांचा असून यासाठी प्रथम आम्ही राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहोत असे देशमुख यांनी सांगितले. काही झाले तरी या वेळेला जो तुतारीचा उमेदवार असेल त्यालाच निवडून आणणार, असा दावा देशमुख यांनी केला आहे. 


 
इतर बातम्या
Join Whatsapp Group