सोलापूर : मला काही जॉब नाही, मला काहीतरी उद्योग धंदा करून द्या, असं म्हणत एका हायस्कूलला मुख्याध्यापक असलेल्या वडिलांना शिवीगाळ करून मारहाण केल्याने व मुलाच्या वारंवारच्या होणाऱ्या त्रासाला कंटाळून लऊळ (ता.माढा) येथील कुर्डूवाडी पंढरपूर रेल्वे लाईनवर जाऊन रेल्वेपुढे वडिलांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
संबंधित मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत बाळासाहेब पितांबर पाटील (रा. सापटणे भोसे ता माढा, वय ५६) हे मयत झाले असून याबाबत निखिल बाळासाहेब पाटील (वय ३०, धंदा-नोकरी रा.सापटणे(भो) ता.माढा) याने दिलेल्या फिर्यादीवरून मुलगा संशयित आरोपी सौरभ बाळासाहेब पाटील (वय २४ वर्ष रा.सापटणे (भो) ता. माढा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास सापटणे भोसे येथे राहत्या घरी फिर्यादीचा भाऊ सौरभ बाळासाहेब पाटील याने मला काही जॉब नाही मला उद्योग धंदा करून द्या, म्हणून पूज्य सुगंधाताई पाटील विद्यालय चिंचोली (ता. माढा) येथे मुख्याध्यापक असलेले वडील बाळासाहेब पाटील यांच्याबरोबर शिवीगाळ करून भांडण केलं होतं.
यावेळी त्याने मारहाणही केली होती. त्याच्या नेहमीच्या शिवीगाळ तसेच मारहाण करण्याच्या त्रासाला कंटाळून फिर्यादीच्या वडिलांनी लऊळ शिवारात ढोरे वस्तीजवळ येऊन रेल्वे रूळाच्याजवळ चालत्या रेल्वेला धडकून आत्महत्या केली.
त्यामुळे त्यांना आत्महत्या करण्यास पुर्णत: आरोपी सौरभ बाळासाहेब पाटील याने प्रवृत्त केलं असल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे. त्यामुळे संशयित आरोपी मुलगा सौरभ पाटील याच्यावर बी.एन.एस कलम १०८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सौरभ पाटील याला पोलिसांनी अटक केली आहे.
मयत मुख्याध्यापक बाळासाहेब पाटील हे माजी आमदार विनायकराव पाटील यांचे पुतणे होते. ते चिंचोली येथील पूज्य सुगंधाताई पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते.
सन २०२७ दरम्यान ते सेवानिवृत्त होणार होते. त्यांनी घटनेतील आरोपी मुलगा सौरभ याला मागील दोन चार वर्षांपूर्वी वैद्यकीय शिक्षणासाठी कर्नाटकमध्ये मोठी रक्कम देऊन प्रवेश घेतला होता.परंतु तेथूनही हा मुलगा अर्धवट शिक्षण सोडून घरी परत आलेला होता.
त्यामुळे त्यांच्यात वारंवार वाद व भांडणे होत होती. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार असून त्यांच्यावर सापटणे या गावी काल मंगळवारी दुपारी एक वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.